रेल्वेच्या ४५ हजार चौ.मी. जागेवर अतिक्रमण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 December 2012

रेल्वेच्या ४५ हजार चौ.मी. जागेवर अतिक्रमण


मुंबई - चर्चगेट ते खार रोड दरम्यान स्थानकालगत असणार्‍या रेल्वेच्या ४५ हजार चौ.मी.हून अधिक जागेवर अतिक्रमण झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. यापैकी वांद्रे येथील बेहरामपाडा व गरीबनगर येथील जागेवर सर्वाधिक अतिक्रमण करून झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. मात्र रेल्वेच्या विकासकामाच्या आड येणारी ही अनधिकृत बांधकामे तोडून टाकण्यात येणार असल्याचा निर्धार पश्‍चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने व्यक्त केला.
उपनगरी प्रवाशांच्या सुविधेसाठी एमयूटीपी-२ अंतर्गत अनेक विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये मुंबई सेंट्रल ते बोरिवलीपर्यंत सहावी लाइन टाकणे, हार्बर मार्गाचा विस्तार करणे, चर्चगेट ते विरार एलिव्हेटेड कॉरिडॉर आदी प्रकल्पांचा समावेश आहे. या विकासकामांसाठी जागेची आवश्यकता भासणार आहे, असे स्पष्ट करतानाच हा अधिकारी म्हणाला, वांद्रे येथील जागेवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी आतापर्यंत आम्ही अनेकदा नोटिशी बजावल्या. या नोटिशी मिळताच राजकीय पुढारी त्यांच्यासाठी धावून येतात. त्यामुळे दिवसेंदिवस या झोपड्या वाढत आहेत. अशा झोपडपट्ट्यांवर या वर्षी तब्बल ११ वेळा कारवाई केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS