डॉ. आंबेडकर स्मारकावरून पालिकेत श्रेयाची लढाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 December 2012

डॉ. आंबेडकर स्मारकावरून पालिकेत श्रेयाची लढाई


मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पालिका सभागृहात सध्या मुंबईच्या विकासावर अभावानेच चर्चा होताना दिसते. सध्याच्या राजकारण्यांनी या सभागृहाचा वापर केवळ आपला स्वार्थ जपण्यासाठी, राजकारण करण्यासाठी सुरू केला आहे. त्यामुळे हे ऐतिहासिक सभागृह राजकारण्यांचा अड्डा तर नाही ना, अशी शक्यता सामन्यांकडून व्यक्त केली जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याचे काँग्रेसकडून जाहीर झाले. यावर विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी मंगळवारी निवेदन केले; परंतु या निवेदनात ही जागा देण्यासाठी काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच प्रयत्न केले, असे भासवून त्यांचे अभिनंदन केले. त्यामुळे काँग्रेसच्या या निवेदनावर शिवसेना, मनसे, सपा, भाजपा या सर्व पक्षांनी हल्लाबोल करत काँग्रेस इंदू मिलच्या जागेचे श्रेय लाटत असल्याचा आरोप केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जागा मिळवण्यासाठी गेली 14 वष्रे दलित जनता भांडत आहे. या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आपापल्या परीने आवाज उठवला असताना केवळ काँग्रेसनेच ही जागा मिळवून दिली, असे सांगत त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, असे सर्व पक्षांकडून सुनावण्यात आले.

मात्र काँग्रेस या प्रक रणाचे श्रेय लाटत असल्याचा आरोप करणार्‍या शिवसेनेकडूनही राज्यसभेत खासदार संजय राऊत यांनी केलेल्या मागणीमुळेच इंदू मिलची साडेबारा एकर जागा मिळाल्याचे सांगितले गेले, तर राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी आपले नेते शरद पवार यांचाही यामध्ये वाटा असल्याचे सांगत आपणही या श्रेयाचे हकदार असल्याचे सांगितले. भाजपा गटनेते दिलीप पटेल यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सत्ताकाळातच या इंदू मिलच्या जागेचा ताबा डॉ. आंबेडकर स्मारकासाठी देण्याचे मंजूर केले होते, मात्र त्या वेळी भाजपाचे सरकार गेल्यानंतर गेली 17 वष्रे काँग्रेसने ही जागा देण्यास उशीर का लावला? असा सवाल करत भाजपामुळेच ही जागा मिळाल्याचे ध्वनीत केले, तर सपाचे नगरसेवक याकूब मेमन यांनी या निवेदनावर बोलताना ही जागा मुळात काँग्रेसने नाईलाजास्तव दिल्याचे सांगत हे सरकार डॉ. आंबेडकरांना मानणारे असते तर एवढा विलंब लावलाच नसता, असे सांगितले. मेमन यांच्या या विधानावर काँग्रेसकडून आक्षेप घेतल्याने सभागृहात मोठा गोंधळ उडाला. 

मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी दलित समाज मनसेकडे जाऊ लागल्यानेच काँग्रेसने दलितांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप केला. 6 डिसेंबरला जमणार्‍या दलित बांधवांना दाखवण्यासाठीच केवळ ही घोषणा केली आहे, नाही तर कागदोपत्रीही हे मान्य झाले असते. जर काँग्रेसचे देशावर प्रेम असेल तर अफझल गुरूला फाशी द्या, असे आवाहन लांडे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS