चौथऱ्यावरील कारवाईच्या अफवेवरून पालिका कार्यालयांवर हल्ला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 December 2012

चौथऱ्यावरील कारवाईच्या अफवेवरून पालिका कार्यालयांवर हल्ला


मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील चौथऱ्यावरील कारवाईची तयारी वरळीच्या महानगरपालिका कार्यालयातून करण्यात येत असल्याच्या माहितीवरून साहेबांच्या चाहत्यांनी वरळी महानगरपालिकेच्या दोन ठिकाणांवर सोमवारी रात्री हल्लाबोल करून तोडफोड केल्याचे उघडकीस आले आहे. यात लाखभर रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून या प्रकरणातील पाच आरोपींना वरळी पोलिसांनी अटक केली आहे. 

शिवाजी पार्कवर बांधण्यात आलेल्या या चबुतर्‍यावर कारवाई करण्याची महानगरपालिका प्रशासनाने तयारी केल्याचे व त्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असल्याच्या बातम्या शिवसैनिकांना मिळत होत्या. त्यामुळे चबुतर्‍याच्या सुरक्षेसाठी शिवसैनिकांचे जत्थेच्या जत्थे दिवसरात्र डोळय़ात तेल घालून पहारा देत आहेत. सोमवारी अशाच शिवसेनाप्रमुखांच्या चाहत्यांना अशी बातमी मिळाली की, डॉ. ई. मोझेस रोड, वरळी येथील मुंबई महानगरपालिका यानगृह व लव्हग्रीन पंम्पिंग स्टेशन या ठिकाणी चबुतर्‍यावर कारवाईसाठी वाहने तैनात करण्यात आली आहेत. या माहितीनुसार काही शिवसेनाप्रमुखांच्या चाहत्यांनी सोमवारी रात्री 10.50 वाजण्याच्या दरम्यान, वरळीच्या महानगरपालिकेच्या यानगृहावर व पम्पिंग स्टेशनवर एकाच वेळी हल्लाबोल करून यानगृहाच्या कम्पाऊंडमधील गार्ड चौकीच्या खिडक्या, ब्रेक डाऊन वाहने, डंपर यांची पेवर ब्लॉक व दगड मारून तोडफोड करण्यात आली. त्याप्रमाणे पम्पिंग स्टेशनमध्येही घुसून सुरक्षा चौकीचे तसेच पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फोडून महानगरपालिकेच्या लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS