मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियमाद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेने निवडून दिलेले 3 नगरसेवक हे महानगर प्राधिकरणाचे सदस्य असतात;परंतु नगरविकास विभागाकडून अद्यापि त्यासंबंधी प्रस्तावच आलेला नसल्याने या नगरसेवकांची एमएमआरडीवरील वर्णी लांबली गेली आहे. यासंदर्भात पालिका चिटणीसांनी वारंवार एमएमआरडीएचे आयुक्त राहुल अस्थाना तसेच नगरविकास विभागाच्या सचिवांना पत्र लिहून ही बाब निदर्शनास आणून यावर अद्यापपर्यंत काहीही कार्यवाही झाली नसल्याचे सभागृहनेते यशोधर फणसे यांनी सांगितले.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्रधिकरण अधिनियम 1974 च्या कलम 4 चे उप कलम (1)चे पोट कलम (6)आणि (7) याप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेने निवडून दिलेले पालिकेचे 3 नगरसेवक हे महानगर प्राधिकरणाचे सदस्य असतात. या अधिनियमानुसार सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवनिर्वाचित नगरसेवकांमधून 3 नगरसेवकांची नियुक्ती मुंबई महानगरपालिकेकडे नगरविकास विभाग मंत्रालय,मुंबई यांजकडून पत्र प्राप्त होणे आवश्यक आहे;परंतु हे पत्र प्राप्त न झाल्यामुळे पालिका चिटणीस यांच्या कार्यालयास पुढील कार्यवाही करणे शक्य झालेले नाही,असे फणसे यांनी सांगितले. पालिकेची सार्वत्रिक निवडणूक 16 फेब्रुवारी 2012 रोजी झाली;परंतु नगरविकास विभागाकडून पत्र प्राप्त न झाल्यामुळे अद्यापपर्यंत पालिकेतून सभागृह नेते,विरोधी पक्षनेते तसेच भाजपा गटनेते यांना एमएमआरडीएवर सदस्य म्हणून जाणे शक्य झालेले नाही.


No comments:
Post a Comment