ऐन गर्दीच्या वेळी डॉकयार्ड रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणार्या लोकलच्या डब्यात स्फोट होऊन या डब्याने अचानक पेट घेतला. त्यात डब्याला लोंबकळणारे ११ प्रवासी गंभीररीत्या होरपळले. या घटनेने एकच हाहाकार उडाला. अनेक प्रवाशांनी जीव वाचविण्यासाठी लोकलमधून उड्या मारल्या, तर स्थानकावर प्रचंड रेटारेटी झाली. जखमींना तातडीने जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेमुळे हार्बरची वाहतूक अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होती.
डॉकयार्ड स्थानकात सकाळी ११.२५ वा. ही दुर्घटना घडली. अंधेरी येथून सुटलेली लोकल (नं. ३००६) डॉकयार्ड स्थानकावर आली, मात्र ती थांबण्याच्या आतच मोटरमनपासून मागे असलेल्या पुरुषांच्या दुसर्या डब्याखालील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होऊन कानठळ्या बसतील असा स्फोट झाला. स्फोटामुळे त्यामधील कुलंट ऑइल बाहेर फेकले गेले आणि उष्णतेमुळे या तेलाने पेट घेतला. तेलामुळे आगीच्या ज्वाळा पसरल्या आणि त्यात प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध दिशेला डब्याबाहेर लोंबकळणारे ११ प्रवासी होरपळले. स्फोटामुळे डब्याचे नुकसान झाले नसले तरी डब्याचा दर्शनी भाग काळा पडला होता.
डब्याने पेट घेतल्याचे कळताच गाडीचे मोटरमन सुभाष महाले यांनी रेल्वे नियंत्रण कक्षाला याची खबर देताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झाले. पोलिसांनी प्लॅटफॉर्मचा ताबा घेऊन तो त्वरित खाली केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या दहा मिनिटांत ही आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे हार्बर मार्गावरील १२ लोकल रद्द करण्यात आल्या. किरकोळ भाजलेल्या प्रवाशांना पाच हजार तर गंभीर जखमी झालेल्यांना रेल्वेने २५ हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
जखमी प्रवाशांची नावे- समद अब्दुल्ला शेख (१९), संदीप पाटील (२१), स्वप्नील केळुसकर (२०) हे तिघे ३२ ते ४२ टक्के भाजले आहेत. खुरदस हुसैन (२६), तझरुल शेख (१८), गणेश मौर्य (२५), सय्यद इमरान अकबर (२८), मेराज रझ्झाक (१६), मोहम्मद आरीझ मोहम्मद हुसैन शेख (१६), शेख बशीर अहमद (३६) यांचाही जखमींमध्ये समावेश असून त्यांना जे.जे. रुग्णालयातील उपचारानंतर सुट्टी देण्यात आली. तर अन्य जखमींमध्ये रामचंद्र नागवेकर (५४) यांना सेंट जॉर्जेस रुग्णालयात नेण्यात आले.


No comments:
Post a Comment