अफजल गुरूला फाशी दिल्यास काश्मीर पुन्हा पेटेल - अँड. प्रकाश आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 December 2012

अफजल गुरूला फाशी दिल्यास काश्मीर पुन्हा पेटेल - अँड. प्रकाश आंबेडकर

दहशतवादी अफजल गुरूला फाशी देऊ नका, अशी विनंती आपण काँग्रेस आणि भारत सरकारकडे करणार आहोत. अफजल गुरूला फाशी दिली तर काश्मीर खोर्‍यातील असंघटित असलेले लोक संघटित होऊन त्याला हुतात्मा म्हणून जाहीर करतील. आमचा सल्ला ऐकला नाही तर काश्मीर पुन्हा पेटेल, असे वक्तव्य भारिप-बहुजन महासंघाचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

तीन-चार दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अफजल गुरूबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे विधान केले होते. या विधानाबाबत भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अफजल गुरूला फाशी देऊ नका. अजमल कसाब आणि अफजल गुरू या दोन वेगवेगळय़ा व्यक्ती आहेत. त्यांचे संदर्भसुद्धा वेगवेगळे आहेत. पार्लमेंटवर जेव्हा हल्ला झाला, त्या वेळी तेथील अनेक कर्मचारी शहीद झाले. त्या वेळी काही नातेवाइकांच्या भावना तीव्र होत्या. देशातील हिंदुत्ववादी मतदार हा बीजेपीचा आहे. बीजेपी त्या मतदाराला गोंजारत आहे. त्यांनीदेखील अफजलच्या फाशीची मागणी केली आहे. राजीव गांधी यांनी काश्मीरमध्ये शहांना मुख्यमंत्री केल्यानंतर तेथील परिस्थिती बिघडत गेली. अजूनही ती तशीच आहे. काश्मीर खोर्‍यात अफगाणपासून ते किर्गिस्तानमधून वेगवेगळे समूह दिसून येतात. त्या ठिकाणी वेगवेगळी माणसे आहेत. ते स्वतंत्र व्यवस्था वर्गाची मागणी करत आहेत. काश्मीरमधील आंदोलन गेल्या 20 वर्षापासून सुरू आहे. अजून या काश्मीर खोर्‍याला नेता मिळालेला नाही. त्यामुळे तेथील अवस्था अशी आहे. तेथील आंदोलन असंघटितरीत्या सुरू आहे. आम्हाला भीती आहे की, अफजल गुरूला फाशी दिली तर असंघटित असलेले समूह संघटित होऊन ते अफजलला हुतात्मा म्हणून जाहीर करतील. त्यांना अशी संधी भारत सरकार आणि काँग्रेसने देऊ नये. 

अफजल गुरूने दिलेला दयेचा अर्ज तसाच पेंडिंग ठेवावा तसेच निवडणुका झाल्यानंतर जो कोणी पक्ष सत्तेत येईल त्यानेसुद्धा अफजल गुरूचा फाशीचा प्रस्ताव पेंडिंग ठेवावा. घटनात्मक दृष्टीने विचार केला तर त्याची शिक्षा माफ करण्याचा निर्णय राष्ट्रपतींनी घेतला पाहिजे. काश्मीर खोर्‍यात 90 टक्के मुस्लीम आहेत. अफजल गुरूबद्दल मला सहानुभूती नाही, मात्र आगामी काळात त्याचे परिणाम वाईट होतील, असे एकूण परिस्थितीवरून दिसून येते. इंग्रजांनी भगत सिंगांना टेररिस्ट म्हटले आहे तर आम्ही मात्र भगत सिंगांना शहीद मानतो. काश्मीरमधील पंडितांबाबत बोलताना ते म्हणाले की, काश्मीरमधील पंडितांना बाहेर हाकलले नाही. भारत सरकारनेच त्यांना बाहेर यायला सांगितले. त्यामुळे ते आले आहेत. काश्मीर खोर्‍यात 90 टक्के मुस्लीम आहेत, अफजल गुरूला फाशी दिली तर तेथील लोक उठाव करतील, अशी भीतीही आंबेडकरांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS