ऊर्मिला पवार 'विद्रोही साहित्य संमेलना'च्या अध्यक्ष - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ऊर्मिला पवार 'विद्रोही साहित्य संमेलना'च्या अध्यक्ष

Share This

मुंबई - धुळे येथे पुढील वर्षी जानेवारीत होणाऱ्या अकराव्या "विद्रोही साहित्य संमेलना'च्या अध्यक्षपदी फुले-आंबेडकरवादी लेखिका ऊर्मिला पवार यांची निवड झाली आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीने आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांनी "अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'चे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल यावेळी टीकास्त्र सोडण्यात आले. आतापर्यंत विद्रोही सांस्कृतिक चळवळीशी नाते सांगणाऱ्या कोत्तापल्ले यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली आणि अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल ढमाले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
धुळे येथे 13 आणि 14 जानेवारी 2013 रोजी "विद्रोही साहित्य संमेलन' होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ऊर्मिला पवार यांची निवड झाल्याची घोषणा विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे पदाधिकारी किशोर ढमाले, किशोर जाधव, एकनाथ ढोकळे आणि संयोजन समितीचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जगदेव यांनी आज पत्रकार परिषदेत केली. "अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'च्या नावाने बोकाळलेल्या "मनुवादा'ला पवार यांच्या निवडीने टक्कर देणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. दोन दिवस चालणाऱ्या "विद्रोही साहित्य संमेलना'ला राज्यातून तीन ते साडेतीन हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील. या संमेलनाचा संपूर्ण खर्च लोकवर्गणीतून केला जाईल, असे आयोजकांनी सांगितले.
कोत्तापल्ले यांनी यापूर्वी साहित्य संमेलनाच्या विरोधात लिखाण केले आहे. "पुणे ते प्रवरानगर, वर्णवर्चस्ववादाचा एक प्रवास' या पुस्तकात त्यांनी कठोर मतप्रदर्शन केले आहे. पण केवळ अध्यक्षपदासाठी त्यांनी भूमिका बदलली ही अतिशय दुर्दैवी बाब आहे, असे ढमाले म्हणाले. कोत्तापल्ले यांच्या त्या पुस्तकातील उताऱ्यांचे पोस्टर विद्रोही संमेलनस्थळी लावण्यात येईल आणि त्यांची बदललेली भूमिका जनतेसमोर ठेवण्यात येईल, असे ढमाले म्हणाले. कोत्तापल्ले यांनी केवळ पदासाठी चळवळीचा आणि सर्जनशीलतेचा बळी दिला. सत्त्व गमावलेले कोत्तापल्ले त्यांच्या वाङ्‌मयीन भूमिकेलाही न्याय देऊ शकत नाहीत, अशी तोफ त्यांनी डागली. कोत्तापल्ले यांनी कष्टकऱ्यांशी प्रतारणा केली असून अध्यक्षपदासाठी संधीसाधू तडजोड केल्याचा आरोपही त्यांनी केला.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असल्याचा दावा करणाऱ्यांची भूमिका कधीच सर्वसमावेशक नव्हती. ते संमेलन केवळ विशिष्ट कंपूचे आणि जातींचे असते. विश्‍व साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पर्यटनकेंद्री संमेलने भरवली जातात. साहित्यबाह्य संमेलने आयोजित करून जात आणि व्यवसाय यांचे नवे नाते प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- किशोर ढमाले, विद्रोही सांस्कृतिक चळवळ

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages