पर्यटकांसाठी ‘कोकण रॉयल’ बससेवा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पर्यटकांसाठी ‘कोकण रॉयल’ बससेवा

Share This

कोकणचे वैभव आणि सौंदर्याला साजेशी अशी अत्यंत आरामदायी व्होल्वो बससेवा एमटीडीसी पर्यटकांसाठी लवकरच घेऊन येत आहे. केमिकल टॉयलेटपासून जगाशी जोडणार्‍या वायफाय यंत्रणेने सुसज्ज असलेल्या या बससेवेचा आज राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शानदार शुभारंभ झाला. ‘कोकण रॉयल’ असे या हायफाय बससेवेचे नाव असून ती पर्यटकांसाठी ‘फुल टू पैसा’ वसूल ठरणार आहे. यावेळी गडकिल्ले, विस्तीर्ण समुद्रकिनारे, सह्याद्रीच्या पर्वतरांगा अशी विविध पर्यटनस्थळांची जगाच्या पाठीवर स्वत:ची ओळख आहे. त्यामुळे ही पर्यटनस्थळे स्वत:च एक ब्रॅण्ड ऍम्बेसेडर असल्याचे छगन भुजबळ म्हणाले.

युरोप पर्यटनाच्या धर्तीवर व कोकणच्या सौंदर्याला साजेशी अशी अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज आरामदायी बससेवा एमटीडीसी पर्यटकांसाठी आणत आहे. या बससेवेमुळे कोकणच्या पर्यटन विकासाला मोठा हातभार लागेल, असे यावेळी छगन भुजबळ म्हणाले. सामान्य पर्यटकांपासून देशी-विदेशी पर्यटकांना या बससेवेचा आनंद घेता येईल तसेच युरोपप्रमाणे एकाच तिकिटावर दिवसभरात पर्यटकांना विविध स्थळे पाहता यावीत अशीही योजना महाराष्ट्रात राबविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी अर्थमंत्री जयंत पाटील, गृहराज्यमंत्री सचिन अहिर, भरत जाधव, सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जगदीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

एमटीडीसीच्या ४३ सीटर व्होल्वो बसमध्ये सुरक्षेसाठी जीपीआरएस ट्रॅकिंग सिस्टिम, मनोरंजनासाठी दोन एलसीडी टीव्ही, पेण्ट्रीज खाद्यपदार्थांची सुविधा, केमिकल टॉयलेट आणि बसमधून जगाशी ऑनलाइन जोडण्याकरिता ‘वायफाय’ सिस्टिमदेखील असणार आहे. अशा प्रकारे अत्याधुनिक व आरामदायी सुविधांची बडदास्त या बसमध्ये असणार आहे. त्यामुळे कोकणचे सौंदर्य पाहण्याचा आगळावेगळा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे.

अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज असलेल्या कोकण रॉयलच्या पाच बसेस जानेवारीच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून कोकणासाठी धावतील. मुंबईतून दोन आणि पुण्यातून दोन बसेस पर्यटकांना कोकणात घेऊन जातील. टूर्स पॅकेज, बुकिंग, राहण्याची सुविधांबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर या सेवेची सुरुवात करण्यात येईल, असे एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages