मुंबई - देशातील एकूण सरासरीपेक्षा मुंबईत समलिंगींमध्ये एचआयव्हीचा संसर्ग होण्याचे प्रमाण दुप्पट आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या एचआयव्ही सेंटीनेल सर्विलन्स अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे. हा अहवाल नुकताच जारी झाला.
समलिंगींमध्ये एचआयव्हीची लागण होण्याचे देशातील प्रमाण ८.८२ टक्के आहे. मुंबईतील हे प्रमाण १८.८० टक्के इतके आहे. २००९ मध्ये ही टक्केवारी १६.४० टक्के अशी होती. इंजेक्शनद्वारे अमली पदार्थ घेणार्या व्यक्तींमध्येही एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण एक टक्क्याने वाढल्याचे हा अहवाल सांगतो.
समलिंगींना समाज इतरांसारखा स्वीकारत नाही. त्यांना रोजगार मिळणेही कठीण होते. परिणामी ते देहविक्रीकडे वळतात आणि त्यातूनच त्यांना एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता वाढते. रोज १५-२० व्यक्तींना त्यांच्यापासून एचआयव्हीची लागण होते, असे एचआयव्ही नियंत्रणासाठी काम करणार्या तज्ज्ञांनी सांगितले.
समलिंगींमध्ये एचआयव्ही जागृतीसाठी त्यांच्यापर्यंत पोहोचता आले पाहिजे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेतले जात आहे. सुरक्षित शारीरिक संबंधांबद्दलच्या उपायांचा अवलंब करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे असे मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थाचे प्रकल्प संचालक डॉ. अरुण बामणे यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment