शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनापूर्वी बाळासाहेब बोलतील तोच शब्द शेवटचा शब्द मानला जात होता. परंतु बाळासाहेबांच्या १७ नोव्हेंबर रोजी झालेल्या निधनानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी मनात येईल त्या मागण्या करून स्वतः पेक्षा शिवसेनेची नाचक्की करण्याची सुपारी घेतली आहे कि काय असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर १८ नोव्हेंबरला त्यांच्यावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराच्या दुसऱ्याच दिवशी ठाकरे कुटुंबीय व शिवसैनिक दुख्खामध्ये असताना शिवसेनेमध्ये अस्तित्व गमावून बसलेले मनोहर जोशी यांनी कोणत्याही कायद्यात बसत नसतानाही बाळासाहेबांचे स्मारक शिवाजी पार्क मैदानामध्येच करू असे पत्रकारांना सांगून टाकले. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनीही बाळासाहेबांचे स्मारक शिवाजी पार्क मध्येच करू असेच म्हटले होते. विशेष म्हणजे शिवाजी पार्क हे मैदान खेळासाठी राखीव आहे, हे मैदान सीआरझेड कायद्यामध्ये येत असल्याने या मैदानावर कायद्याप्रमाणे कोणतेही बांधकाम करता येत नाही. याची माहिती लोकसभेचे माजी अध्यक्ष पद भूषवणारे मनोहर जोशी किंवा खासदार असलेल्या संजय राऊत यांना माहित नसेल याची शक्यता कमी आहे. तरीही जी मागणी पूर्णच होऊ शकत नाही अशी मागणी करून जोशी आणि राऊतानी स्वताला प्रसिद्धी मिळवून घेतली.
असेच स्वताला प्रसिद्धी मिळवून घेण्याचे प्रकार सध्या मुंबई महानगर पालिकेमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. पालिकेमध्ये शिवसेना भाजप युतीची गेले १७ वर्षे सत्ता असतानाही पालिकेच्या नियमात कोणत्या गोष्टी बसतात याची थोडीही माहिती पदाधिकाऱ्याना नाही असेच म्हणावे लागेल. शिवाजी पार्क हे मैदान खेळासाठी राखीव असल्याचा ठराव याच पालिकेमध्ये झाला, याच पालिकेमध्ये कोणत्याही भारतीय व्यक्तींची नावे रस्ताला, उद्यानाला, विभागाला असल्यास बदलू नये असा ठराव झाला आहे.
तरीही स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी शिवाजी पार्क चे नामांतर "शिवतीर्थ" करण्याचा सूचना प्रस्ताव सभागृहा पुढे आणला. असा प्रस्ताव पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये आधी आणावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदलून शिवतीर्थ करणार असे समजताच सर्व विरोधी पक्षानी विरोध केल्याने व सत्ताधाऱ्यांच्या सोबत असलेल्या भाजपने कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नसल्याने गटनेत्यांची बैठक रद्द करण्याची नामुष्की सत्ताधारी शिवसेनेवर ओढवली आहे. पालिकेमधील सर्व विरोधी पक्षांचा विरोध असल्याचे पाहून राहुल शेवाळे यांना घुमजाव करत सभागृहापुढे सूचना प्रस्ताव मांडला असतानाही मी शिवाजी पार्कचे नव्हे तर बाळासाहेबांच्या अंत्यसंस्कार झालेल्या चौथरयाला शिवतीर्थ असे नाव द्या असा सूचना प्रस्ताव दिला असल्याचे सांगावे लागत आहे.
स्थायी समिती अध्यक्ष शेवाळे यांनी बाळासाहेबांच्या स्मारकासाठी पालिकेच्या स्थायी समितीमध्ये महापौरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्याची घोषणा केली होती. हि समिती सुद्धा आम्ही किती कट्टर शिवसैनिक आहोत हे दाखवण्यासाठी घोषित करण्यात आली आहे. हि समिती अजूनही अस्तित्वात आलेली नाही. या समितीची अद्याप एकही बैठक झालेली नाही, यामुळे हि समिती कागदावरच राहिली आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाचा निर्णय शिवसेनेचे वरिष्ठ नेते घेणार असताना पालिकेमध्ये अशी समिती कशासाठी घोषित करण्यात आली असाच प्रश्न सध्या सर्वाना पडला आहे.
बाळासाहेबांच्या शिवाजी पार्क येथील अंत्यसंस्कार झालेल्या चौथरयाबाबत सुद्धा आम्ही काहीही झाले तरी आम्ही चौथरा हलवणार नाही अशी भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली होती. शिवसेनाप्रमुखांचे अंत्यसंस्कार शिवाजी पार्क येथे करावे यासाठी संजय राऊत व सुनील प्रभू यांनी पालिका व राज्य सरकारकडून परवानगी मिळवली होती. राज्य सरकारने विशेष बाब म्हणून शिवसेनेला एक दिवसाची परवानगी दिली होती. एका दिवसाची परवानगी दिली असतानाही शिवसेनेच्या नेत्यांनी अंत्यसंस्कार झालेली जागा सोडण्यास नकार दिला होता. शिवसेना अंत्यसंस्कार केलेली जागा सोडत नसल्याने परवानगी मागणाऱ्या महापौर सुनील प्रभू आणि संजय राऊत यांना पालिकेने नोटीस देवून शिवाजी पार्क वरील जागा खाली करण्यास सांगितले होते.
शिवाजी पार्क वरील जागा शिवसेनेने खाली केली नसती तर मुंबईच्या महापौरांवर म्हणजेच सुनील प्रभू यांच्यावर अनधिकृत बांधकामाला पाठींबा दिल्याचा ठपका ठेवून नगरसेवक पद व त्याबरोबर महापौरपद गमावण्याची वेळ आली होती. परंतु पालिकेमधील कमजोर विरोधी पक्षांमधील कमजोर नेत्यांमुळे प्रभू यांचे नगरसेवक पद अजूनही शाबूत आहे असेच म्हणावे लागेल. पालिकेने दिलेल्या नोटीसीमुळे व शासनाकडून शिवाजी पार्कवरील चौथरा कायम करण्यासाठी कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने १७ डिसेंबरला सदर चौथरा हलवण्यात येणार असल्याचे संजय राऊत यांनी पालिकेला लेखी कळवले आहे.शिवसेना प्रमुखांचा अंत्यसंस्कार झालेला चौथरा हलवल्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या व शिवाजी पार्क नागरिक संघ यांच्या कार्यालयाच्या मध्य भागी महात्मा गांधी जलतरण तलावाच्या समोरच बाळासाहेबांच्या अस्थि जमिनीमध्ये पुरून वर हिरवळ केली जाणार आहे. याबाबत पालिकेची परवानगी लागणार असल्याने शनिवारी सकाळी गटनेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. परंतु भाजपचे गटनेते मुंबईमध्ये नसल्याचे कारण देत पुन्हा गटनेत्यांची बैठक रद्द करण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यावर आली आहे.
बाळासाहेबांच्या हयातीत कधीही शिवसेनेवर एवढी नामुष्की ओढवली नव्हती. परंतु बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी आम्ही किती कट्टर शिवसैनिक आहोत हे दाखवून स्वताला प्रसिद्धी मिळवून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. शिवाजी पार्क मध्ये बाळासाहेबांचे स्मारक उभारणे, चौथरा हटवणार नाही, शिवाजी पार्कचे नामांतर शिवतीर्थ करणे, बाळासाहेबांच्या स्मारकासाठी पालिकेमधील गटनेत्यांची समिती नेमने, अशा पूर्ण न होणाऱ्या मागण्या करून नेत्यांनी स्वताला प्रसिद्धी मिळवून घेण्याचा प्रकार केल्याने वेळोवेळी शिवसेनेची नाचक्की केली आहे. एकीकडे नेते स्वताला प्रसिद्धी मिळवून घेत असताना उद्धव ठाकरे यांनी नागपूर मध्ये स्मारकाचा वाद निमण करणाऱ्या नेत्यांचा समाचार घेऊ असे जाहीर केले आहे. यामुळे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे कोणाकोणाचा समाचार घेतात याची वाट सामान्य शिवसैनिक बघत आहेत.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३


No comments:
Post a Comment