मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी झालेल्या बैठकीत कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मुंबईतील व्यापाऱ्यांनी स्थानिक पालिक कर अर्थात 'एलबीटी' विरोधात आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.मुंबईच्या बहुतांश व्यापाऱ्यांचा या बंदला पाठिंबा असल्याने बाजारपेठा बंद असून सामान्य मुंबईकरांना त्याचा फटका बसत आहे.
एलबीटीवरुन सरकार आणि व्यापारी आमने-सामने आले आहेत. येत्या ऑक्टोबरपासून राज्यभर एलबीटी लागू केला जाणार असून सरकारच्या या निर्णयाला व्यापाऱ्यांचा कडाडून विरोध आहे. राज्यभर गेल्या काही दिवसांपासून याविरोधात आंदोलनाचा वणवा पेटला आहे. या आंदोलनाला शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पार्टी या राजकीय पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र सरकारने याबाबत ताठर भूमिका घेतली आहे. काल याबाबत मुख्यमंत्री तसेच व्यापाऱ्यांच्या शिष्ठमंडळाची बैठक झाली. ही बैठक कोणत्याही तोडग्यावीना संपली. त्यानंतर व्यापाऱ्यांनी आर-पारच्या लढाईची हाक देत आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.
'फॅम' या व्यापाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेने ही बंदची हाक दिली असून संघटनेचे अध्यक्ष मोहन गुरनानी यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. मुंबईत आधीच घाऊक व्यापाऱ्यांनी आंदोलन छेडले होते, त्यात आता किरकोळ व्यापारीही उतरले असून आज मुंबईतील बाजारपेठा बंद आहेत. व्यापाऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेतली जाणार नाही, असा पवित्रा घेतला असून हे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

No comments:
Post a Comment