मुंबई : धारावी पुनर्विकासातून मिळणारे मुंबईतील ऐन मोक्याचे भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न शासन करत असल्याचा आरोप धारावी बचाव आंदोलकांकडून करण्यात आला असून शासनाच्या वागणुकीचा निषेध करण्यासाठी येत्या १५ जूनपासून धारावीतील प्रत्येक घरावर काळे झेंडे फडकवण्यात येणार असल्याचे सोमवारी धारावी बचाव आंदोलकांकडून सांगण्यात आले.
धारावीकरांना विश्वासात न घेता धारावी पुनर्विकासाचा आराखडा तयार करण्यात आला, मात्र धारावीकरांचा या आराखड्याला आक्षेप असून धारावीकरांच्या मागण्यांसाठीच धारावी बंद आंदोलन छेडण्यात आले होते. धारावीकरांना दुर्लक्षित करून केवळ आमदार, खासदार, विकासक यांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत असल्याचेही धारावी बचाव कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. पुनर्विकासात कोणताही वाढीव एफएसआय न मागता धारावीकर आपल्या हक्काची जागा मिळवण्यासाठी प्रय करत आहेत, मात्र ५५ हजार झोपडीधारकांना अपात्र ठरवून धारावीकरांना धारावीबाहेर हाकलण्याचे सत्र सुरू केले आहे. त्यामुळे धारावीकरांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय विकासकामांना विरोध करण्यात येईल आणि वेळ पडल्यास धारावी बचाव आंदोलानाचे कार्यकर्ते व धारावीकर यांना अटक झाली तरी चालेल, असेही सांगण्यात आले. त्या वेळी धारावी बचाव आंदोलनाचे कार्याध्यक्ष बाबुराव माने, सचिव भानुदास बोबडे, दिलीप कटके, अँड़ संदीप कटके, प्रवक्ता मुत्तु तेवर, जनार्दन तावडे, अनिल कासारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment