आश्रमशाळांतील शिक्षक दोन महिने वेतनाविना - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आश्रमशाळांतील शिक्षक दोन महिने वेतनाविना

Share This
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विभागातील आश्रमशाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नसून प्रकल्प अधिकार्‍यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे पगाराविना राहावे लागत असल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे.

एकीकडे ठेकेदारांची बिले त्वरित मंजूर करून शिक्षकांचे वेतन काढण्यास दिरंगाई करण्यात येत असून दोन दिवसांत शिक्षकांना वेतन न मिळाल्यास अप्पर आयुक्त आदिवासी विभाग कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्याचा इशारा शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी दिला असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे संगठनमंत्री अनिल बोरनारे यांनी दै. 'पुण्य नगरी'शी बोलताना सांगितले. ठाणे जिल्ह्यातील शहापूर, जव्हार आणि डहाणू प्रकल्प अधिकार्‍यांच्या अंतर्गत असलेल्या आश्रमशाळांमध्ये शिक्षकांना वेतन मिळण्यास विलंब झाला. आजही शिक्षकांना दोन महिन्यांचे वेतन मिळाले नसून शाळांना सुट्टी लागल्यावरही पगार नसल्याने शिक्षकांना गावी जाण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकीकडे आदिवासी विभागातील ठेकेदारांची देयके अधिकार्‍यांनी ३१ मार्चपूर्वी प्राधान्याने मंजूर केली असून शिक्षक आणि शिक्षकेतरांची पुरवणी देयके जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली आहेत, असा आरोपही शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी केला आहे. येत्या दोन दिवसांत शिक्षकांचे पगार न मिळाल्यास शिक्षक आमदार आदिवासी विभागातील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करतील, असा इशारा शिक्षक परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages