बेकायदा गुटखा विक्रीवर निर्बंध आणणार- अजितदादा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेकायदा गुटखा विक्रीवर निर्बंध आणणार- अजितदादा

Share This
मुंबई : राज्यात संपूर्ण गुटखाबंदी असतानाही काही ठिकाणी लपूनछपून गुटखा विकला जातो. तो सुद्धा दामदुपटीने पैसे घेऊन. हे प्रकार रोखण्यासाठी आपण लवकरच गृहमंत्र्यांशी चर्चा करू, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृह खात्याचा कारभार ढिला असल्याची जाहीर कबुली दिली. 

यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या तंबाखूविरोधी कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात गुटख्याच्या माध्यमातून राज्याला १२५ कोटी रुपयांचा महसूल मिळत होता; पण राज्यातील युवा पिढीच्या रक्षणासाठी आम्ही त्यावर पाणी सोडले. इतका महसूल सोडल्यानंतरही आज लपूनछपून गुटखा विकला जातच आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी चर्चा करून गुटखाबंदीची काटेकोर अंमलबजावणी कशी होईल हे पाहिले जाईल, असेही ते म्हणाले. तंबाखूच्या दुष्परिणामांचे जिवंत उदाहरण आम्ही आमच्या घरातच पाहिले आहे. आमचे नेते शरद पवार यांना २00४ मध्ये कर्करोग झाला. निवडणुकांच्या तोंडावर त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली; पण ते डगमगले नाहीत. सेनापती नाही असे समजा; पण लढाई तर करावी लागेल, असे ते म्हणाले. या वेदना काय असतात ते आम्ही अनुभवले आहे, असेही पवार यांनी सांगितले. नरोत्तम सेखसारिया फाऊंडेशनतर्फे या वेळी काही व्यक्ती आणि संस्थांना 'तंबाखूमुक्त भारत' पुरस्कार देण्यात आले. अलिबाग जिल्हा रुग्णालयाचे डॉ. उल्हास वाघ, सिंधुदुर्गचे किशोर सोनसूरकर, चंद्रपूरचे थुत्रा गावचे सरपंच वामन भिवपुरे आणि आशाताई माटे यांना व्यक्तिगत पुरस्कार देण्यात आले. राजस्थानमधील झुझनू येथील शिक्षित रोजगार केंद्र प्रबंधक समिती, पुण्याची साधना इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, सांगलीतील वसुंधरा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि राजारामबापू पाटील जनप्रबोधिनी या संस्थांना हा पुरस्कार देण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages