मुंबई - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या घाटकोपर येथील स्मारकासाठी भूसंपादन आणि पुनर्वसनाचे काम तातडीने मार्गी लागणे आवश्यक आहे. याबाबत येत्या 1 ऑगस्टपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास 10 हजार कार्यकर्त्यांसह बेमुदत उपोणाला बसण्याचा इशारा अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांनी दिला आहे.
अण्णाभाऊंनी वास्तव्य केलेले घाटकोपरच्या चिरागनगरमधील घर आणि लगतच्या परिसरात त्यांचे स्मारक उभारण्याची योजना आहे. 2003 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात बैठक घेतली होती. या घरात अण्णाभाऊंची सर्व पुस्तके ठेवून स्मारकाचे जतन करावे, असे स्पष्ट निर्देश त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिले होते; मात्र अद्यापही त्यावर कार्यवाही झालेली नाही. राज्य सरकारने 1 ऑगस्ट या अण्णाभाऊंच्या जयंतीपर्यंत स्मारकाबाबत ठोस निर्णय घ्यावा; अन्यथा 1 ऑगस्टलाच एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जाईल. त्यानंतर 31 ऑगस्टपासून 10 हजार कार्यकर्त्यांसह बेमुदत उपोषणाला बसू, असे कदम यांनी सरकारला कळविले आहे.
स्मारकासाठी आवश्यक सर्वेक्षण करण्याचे व अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी 2003 मध्ये दिले होते. अण्णाभाऊंच्या राहत्या घरासह शेजारील 1008 चौरस मीटर जागा स्मारक म्हणून विकसित करण्याचे 2 डिसेंबर 2012 रोजी झालेल्या बैठकीत ठरले. स्मारकासाठी लगतच्या 37 घरांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. त्यासाठी भूसंपादन करण्याचा निर्णय झाला आहे; मात्र स्मारकाच्या इमारतीसाठी सरकारने केवळ चार कोटी 12 लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे भूसंपादन व पुनर्वसनाबाबत सरकारने निर्देश द्यावेत, असा अहवाल अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे अध्यक्ष असलेल्या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी सरकारला दिला. भूसंपादन व पुनर्वसनाचा खर्च कसा करावा, याबाबत सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. सरकारकडून स्मारकाच्या नावावर केवळ टोलवाटोलवी सुरू आहे, असा आरोप कदम यांनी केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने 2001 पासून या स्मारकासाठी प्रयत्न सुरू केले असून अण्णाभाऊंची राहती खोली व शेजारच्या दोन खोल्या पक्षाने साडेअठरा लाख रुपये किमतीला खरेदी केल्या आहेत. या खोल्या स्मारकासाठी राज्य सरकारला देण्यास पक्ष तयार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने या स्मारकासाठी समिती नियुक्त केली आहे. रमेश कदम या समितीचे सचिव असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. एप्रिल महिन्यात कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून स्मारकाबाबत पुढील निर्णय घेण्याची मागणी केली होती; मात्र अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
सरकारने अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्याची व आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बनविण्याची गरज आहे; मात्र मुख्यमंत्री या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. सरकारने याबाबत निर्णय घेतला नाही, तर 1 ऑगस्टला आझाद मैदानात लाक्षणिक उपोषण व 31 ऑगस्टपासून 10 हजार कार्यकर्त्यांसह बेमुदत उपोषणाला बसण्याचे आम्ही ठरविले आहे.
- रमेश कदम (अध्यक्ष, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ)

No comments:
Post a Comment