मुंबईत क्षयरोगाचे प्रमाण वाढले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत क्षयरोगाचे प्रमाण वाढले

Share This



मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांत घट 
अतिताणाचा मुंबईकरांना ताप
मुंबई : पावसाळ्याच्या काळात मुंबईत उद्भवणार्‍या साथीच्या आजारांना लगाम घालण्यास पालिका यशस्वी झाली आहे. मात्र या काळात क्षयरोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. गेल्या वर्षभरात क्षयरोगामुळे ६ हजार ९२१ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा दावा प्रज्ञा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने केला आहे. फाऊंडेशनने सोमवारी आरोग्य विषयक नवा अहवाल प्रकाशित केला. यामध्ये क्षयरोगाच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली आहे.

गेल्या काही वर्षांत विशेष करून पावसाळ्याच्या काळात पाणी साचून मलेरियाचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता. यावर आळा घालण्यासाठी पालिकेने विविध योजना हाती घेतल्या होत्या. वर्ष २0१0-११ मध्ये मलेरियाचे जवळपास ७८ हजार रुग्ण आढळून आले होते. पालिकेच्या उपाययोजनांमुळे वर्ष २0१२-१३ मध्ये या रुग्णांची संख्या तब्बल २२ हजारपर्यंत घसरली आहे. मलेरियाप्रमाणे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. मात्र क्षयरोगाच्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या वर्षी पालिका आणि सरकारी दवाखाने व रुग्णालयांत क्षयाचे ३६ हजार ४१७ रुग्ण आढळून आले होते. यापैकी ६९२१ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या पाच वर्षांत क्षयरोगामुळे ३९ हजार ५३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्ष २0१२-१३ मध्ये मुंबईतील ५६७ पैकी एका व्यक्तीला मलेरिया, २ हजार ५५५ पैकी एकाला डेंग्यू, ३४१ पैकी एकाला क्षय आणि ६३ हजारपैकी एकाला कॉलरा झाला असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अंधेरी पूर्व विभागात विविध प्रकारच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. के/ई प्रभागात मलेरिया, डेंग्यू आणि क्षयरोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. याशिवाय कुर्ला पश्‍चिम एमसीजीएमचा एल प्रभाग येथे डायरियाचे प्रमाण सर्वाधिक आहे. अंधेरी पूर्व आणि कुर्ला पश्‍चिम येथे डायरियाचे अनुक्रमे ६६00 आणि १२ हजार रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या प्रभागातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठय़ाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

प्रज्ञा फाऊंडेशनने माहितीच्या अधिकारांतर्गत पालिका आणि राज्य सरकारचे दवाखाने, रुग्णालये आणि अन्य सरकारी आरोग्य सेवा केंद्रांतून साथीच्या रोगांविषयी माहितीचे संकलन केले आहे. मुंबईतील अंदाजे ७0 टक्के लोकसंख्या उपचारासाठी खाजगी आरोग्य सेवा केंद्रात जातात. शहरातील केवळ ३५ टक्के नागरिक पालिका आणि सरकारी दवाखाने व रुग्णालयात उपचार करून घेतात. सरकारी रुग्णालये आणि दवाखान्यातून आरोग्य विषयक माहिती उपलब्ध होत असताना खाजगी रुग्णालयातून मात्र माहिती उपलब्ध होत नसल्याबद्दल फाऊंडेशनने चिंता व्यक्त केली आहे. खाजगी डॉक्टर, क्लिनिक आणि इतर रुग्णालयांत जाणार्‍या रुग्णांची आरोग्य सेवेची माहिती उपलब्ध नसल्याने आरोग्य सेवा विषयक धोरण कसे ठरवता येणार, असा सवाल फाऊंडेशनचे संस्थापक विश्‍वस्त नीताई मेहता यांनी उपस्थित केला आहे.

वाढते प्रदूषण, बिकट वाहतूक समस्या, कौटुंबिक - कार्यालयातील स्पर्धा यामुळे दिवसेंदिवस मुंबईकरांना अतिताणाचा सामना करावा लागत आहे. मानसिक आणि शारीरिक अतिताणाचा कामावरही परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. वर्ष २00८-0९ मध्ये अतिताणामुळे ३ हजार ६६९ मुंबईकरांचा मृत्यू झाला होता. अहवालातील माहितीनुसार यामध्ये २0१0-११ मध्ये वाढ होऊन आकडेवारी ४ हजार ६४३ पर्यंत होती. मात्र २0१२-१३ पर्यंत अतिताणमुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ३ हजार ९७४ पर्यंत घसरली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages