महाराष्ट्र सदन घोटाळ्यात कंत्राटदारावर मेहरनजर - किरीट सोमय्यां - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात कंत्राटदारावर मेहरनजर - किरीट सोमय्यां

Share This
मुंबई : महाराष्ट्र सदनाचे निकृष्ट तसेच अर्धवट काम करणार्‍या कंत्राटदाराला ५0 हजार चौरस फुटांचे चटईक्षेत्र दिल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सदनाच्या घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

निकृष्ट आणि अपुर्‍या बांधकामाने दिल्लीतील महाराष्ट्र सरकारच्या निवासी आयुक्तांनी सदनाचा ताबा घेण्यास नकार दिला आहे. दिल्लीतील निवासी आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सर्वसाधारण प्रशासकीय खात्याने या बांधकामाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या निकृष्ट कामांची चौकशीही सुरू आहे. तरीही मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदाराला ५0 हजार चौरस फूट चटईक्षेत्र दिले आहे. त्याची किंमत आज एक हजार कोटींहून अधिक आहे.

जुलै २0१२मध्ये प्रतिभा पाटील राष्ट्रपती असताना अपुर्‍या बांधकामामुळे सदनाचे उद्घाटन रद्द करण्यात आले होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गेल्या महिन्यात महाराष्ट्र सदनाचे उद्घाटन केले होते. बांधकाम पूर्ण झाले नसताना आणि निकृष्ट असताना मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन रद्द करणे आवश्यक होतेच होते. तशी सूचना दिल्लीच्या निवासी आयुक्तांनी दिली होता. मात्र, ती धुडकावून उद्घाटन करण्यामागे मुख्यमंत्र्यांचा नेमका काय हेतू होता, याची चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे.

भुजबळही सामील?
सोमय्या यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यावरही तोफ डागली. ते म्हणाले, महाराष्ट्र सदनात १0 कोटींचे फर्निचर पुरवणारी कंपनी भुजबळ यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची आहे. मात्र, पुरवण्यात आलेल्या फर्निचरला वाळवी लागलेली आहे तसेच त्याची अवस्थाही खराब आहे. 

तटकरेंवरही आरोप
-कोळसा घोटाळ्यातील कंपनीत जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची गुंतवणूक असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या ग्रेस इंडस्ट्रीज लिमिटेड आणि गुप्ता कोल कंपनीमध्ये तटकरे कुटुंबाचे मालकी हक्क आहेत. 
-तटकरे यांचा मुलगा अनिकेत, मुलगी आदिती आणि सून वेदांती हे नेक्स्ट टेक्नोलॉजीजचे प्रमोटर आहेत. नेक्स्ट टेक्नोलॉजीने ग्रेस इंडस्ट्रीज आणि गुप्ता कोल कंपनीत गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तटकरे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करून निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages