लोकलमध्ये नर्सची मद्यपीकडून छेड - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लोकलमध्ये नर्सची मद्यपीकडून छेड

Share This
मुंबई : धावत्या लोकलमध्ये देवेंद्र ऊर्फ देवराज हनुमंत कनका (२८, रा. कुर्ला) या मद्यपी तरुणाने महिलांच्या डब्यात प्रवेश करून एका नर्सची (परिचारिका) छेड काढल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी ६च्या दरम्यान पश्‍चिम रेल्वेच्या महालक्ष्मी ते लोअर परळ स्थानकांदरम्यान घडली. या नर्सने आरडाओरड केल्याने प्रवाशांनी तरुणाला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. 

हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नर्सचे काम करीत असलेली ही तरुणी माटुंग्याकडे जाण्यासाठी चर्चगेट ते बोरीवली स्लो लोकलमध्ये मागच्या लेडीज डब्यात मुंबई सेंट्रल स्टेशनवर बसली. या डब्यात ती एकटीच होती. महालक्ष्मी स्थानकावर हा मद्यपी तरुणही डब्यात शिरला. पुढे तिच्याजवळ येऊन लगट करण्याचा प्रयत्न करू लागला. घाबरलेल्या नर्सने आरडाओरड केली. तोपर्यंत लोकल लोअर परळ स्थानकावर येऊन थांबली होती. त्याच वेळी या नर्सने डब्यातील अलार्म वाजवून इतर प्रवाशांचे लक्ष वेधले. त्यामुळे या तरुणाने फ्लॅटफॉर्मच्या विरुद्ध दिशेने उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्याने प्रवाशांनी पाठलाग करून त्याला बेदम चोप देत मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. या डब्यात ड्युटी असलेल्या कॉन्स्टेबल देवेंद्र एकनाथ शिंदे याला कामावर हजर न राहिल्याने निलंबित केल्याचे रेल्वेचे पोलीस आयुक्त प्रभातकुमार यांनी सांगितले. प्रत्येक महिला डब्यात रात्री गार्ड असणे बंधनकारक आहे. मात्र, या डब्यात असा कुठलाही गार्ड नव्हता. त्यामुळे रेल्वेने महिला प्रवाशांच्या सुरक्षेचे केलेले दावे या घटनेने फोल ठरविले आहेत. 

देवराज कणका हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर कुर्ला व कल्याण येथे सोनसाखळीचे गुन्हे दाखल आहेत. दुपारी त्याला न्यायालयाने ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

कॉन्स्टेबल निलंबित...
चर्चगेट-बोरीवली रेल्वेमध्ये गार्डची ड्युटी असताना गैरहजर राहिलेल्या कॉन्स्टेबल देवेंद्र एकनाथ शिंदे याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. शिंदेची रेल्वे ग्रुप क्र. २९मध्ये रात्रपाळीची ड्युटी होती.

१,२00 पोलिसांची गरज; उपलब्ध ४५0 ...
मध्य व पश्‍चिम रेल्वेतून प्रवास करणार्‍या महिला प्रवाशांना सुरक्षा पुरविण्यासाठी सुमारे १,२00 पोलिसांची गरज आहे. प्रत्यक्षात सध्या त्यासाठी ४५0 कॉन्स्टेबल कार्यरत असून, त्यापैकी पश्‍चिम रेल्वेमार्गावर १५0 कर्मचारी नेमण्यात आले असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

रेल्वेत सहा महिन्यांत ४२ गुन्हे ...
महिलांच्या सुरक्षेबाबत विविध उपाययोजना राबवित असल्याचा पोलिसांकडून दावा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात रेल्वेतील गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. गेल्या ६ महिन्यांत मध्य, पश्‍चिम व हार्बर मार्गावर तब्बल ४२ गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये बलात्काराच्या २, विनयभंगाच्या २३ व छेडछाडीच्या ५ घटनांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages