पावसाची उघडीप मिळाल्यास खड्डे बुजवणार-आयुक्त सीताराम कुंटे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पावसाची उघडीप मिळाल्यास खड्डे बुजवणार-आयुक्त सीताराम कुंटे

Share This
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सतत पडणार्‍या मुसळधार पावसामुळे मुंबईत विविध ठिकाणी रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत.या मुद्दय़ावर पालिका तसेच विधानसभेत नगरसेवक आणि आमदारांनी चर्चा केल्या आहेत. खड्डय़ांमुळे मुंबईकरांनी मनपा प्रशासनाच्या नावाने बोटे मोडली आहेत. मुंबईकरांचा वाढता संताप पाहता प्रशासनाने खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. आगामी चार ते पाच दिवसांत पावसाची उघडीप आणि वातावरण पोषक राहिल्यास रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजवण्यात येतील, असे आश्‍वासन आयुक्त सीताराम कुंटे यांनी रेड एफ.एमवर मुंबईकरांशी संवाद साधताना दिले.

जून महिन्यापासून आतापर्यंत सरासरीपेक्षा तिप्पट पाऊस पडल्याने रस्त्यावरील खड्डय़ांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्याच्या घडीला मुंबईत जवळपास १0 हजारांहून अधिक खड्डे आहेत. आगामी काळात सण आणि उत्सवांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे खड्डय़ांचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाने गुरुवारपासून विश्रांती घेतली आहे. या काळात मनपा प्रशासनाने खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले असल्याचे आयुक्तांनी यांनी सांगितले. मुंबई मनपाशिवाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई पोर्ट ट्रस्ट या विविध प्राधिकरणांच्या अखत्यारित रस्त्यांची दुरुस्ती होणे बाकी आहे. त्यामुळे या प्राधिकरणांनी आपल्या हद्दीतील खड्डे बुजवावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.

खड्डे बुजवण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.भूगर्भातून जाणार्‍या केबल्सची दुरुस्ती काढण्यासाठी काही वेळा रस्ता खोदण्यात येतो. त्यामुळे सर्व रस्त्याची दुर्दशा होत आहे. यावर मात करण्यासाठी आता हायड्रोलिक ड्रिलिंगद्वारे विशिष्ट भूगर्भातून केबलची दुरुस्ती करण्यात येणार आहे.रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत आणि वारंवार खड्डे पडू नयेत म्हणून टेक्निकल सल्लागार समितीच्या उपाययोजनांवर मनपा प्रशासन कार्यरत असल्याचे आयुक्तांनी या वेळी सांगितले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages