मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावर गारेगार प्रवासाचे स्वप्न पाहणार्या मुंबईकरांना आणखी काही महिने थांबावे लागणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर चालविण्यात येणार्या पहिल्या एसी लोकलचा प्रवास काही महिन्यांसाठी लांबणीवर पडला आहे. प्रत्यक्षात जुलै महिन्यात सुरू होणारी एसी लोकल आता फेब्रुवारी २0१४ मध्ये धावणार आहे. एसी लोकलच्या डब्यांची निर्मिती करताना त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे ही लोकल धावण्यास विलंब होणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर धावणार्या पहिल्या एसी लोकलच्या डब्यांच्या निर्मितीचे काम पेरुम्बर येथील रेल्वेच्या कारखान्यात सुरू आहे. हे काम जूनपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा होती, परंतु या डब्यांच्या निर्मितीमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. भारतीय रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर चालविण्यात येणारी ही पहिलीच एसी लोकल असल्यामुळे एसी लोकलसाठी लागणारे तंत्रज्ञान, इलेक्ट्रिकल यंत्रणा आणि डब्यांची रचना यात वेळ लागत आहे. एसी लोकलची रचना ही कोलकात्याच्या मेट्रोप्रमाणे असून किमान ४ कोटी रुपये खर्च यासाठी येणार आहे. त्यातील एका डब्यात किमान ४00 प्रवासी बसू शकतात. या लोकलमध्ये आसनव्यवस्था वेगळी आहे. या एसी लोकलमध्ये मेल-एक्स्प्रेसप्रमाणे कोणत्याही डब्यात येण्याची-जाण्याची सुविधा असणार आहे. परंतु या एसी लोकलमध्ये महिलांसाठी स्वतंत्र असा डबा असण्याविषयी अजून कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच या लोकलमध्ये फस्र्ट क्लास आणि माल डब्यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. एसी लोकल ही संपूर्णत: एसी (अल्टरनेट करंड) वर चालणार असून चर्चगेट-बोरिवली, चर्चगेट-अंधेरी मार्गावर एसी लोकल चालविण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment