डॉ. आंबेडकर स्मारकाच्या 'मास्टर प्लॅन'साठी 13 कंपन्या उत्सुक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ. आंबेडकर स्मारकाच्या 'मास्टर प्लॅन'साठी 13 कंपन्या उत्सुक

Share This
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक जागतिक दर्जाचे असावे, यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम संकल्पना निवडण्याच्या उद्देशाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केलेल्या आवाहनाला पाच परदेशी आणि आठ भारतीय सल्लागार कंपन्यांनी स्वारस्य दाखविले आहे. आता या कंपन्यांतून पात्र कंपन्यांची निवड करून त्यांच्यात सर्वोत्कृष्ट "मास्टर प्लॅन'साठी स्पर्धा भरविली जाणार आहे आणि त्यातून सर्वोत्तम "मास्टर प्लॅन' निवडून त्याआधारेच स्मारकाचे काम केले जाणार आहे. 

आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळण्याचे निश्‍चित झाल्याने राज्य सरकारने एमएमआरडीएला "विशेष नियोजन प्राधिकरण' म्हणून नेमले आहे. त्याअनुषंगाने "मास्टर प्लॅन'करिता स्पर्धा भरविण्यासाठी एमएमआरडीएने 12 जुलै रोजी जाहिरात देऊन जागतिक स्तरावर सल्लागाराचे काम करणाऱ्या इच्छुक कंपन्या किंवा जास्तीत जास्त तीन कंपन्यांच्या समूहांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यांना 30 दिवसांच्या आत विशिष्ट निकषांच्या आधारे प्रस्ताव देण्यास सांगितले होते. 

त्याप्रमाणे 12 ऑगस्टच्या अखेरच्या दिवसापर्यंत 13 सल्लागार कंपन्यांचे प्रस्ताव आले असून, त्यात आठ भारतीय आणि पाच परदेशी कंपन्या आहेत. आता ठरलेल्या निकषांच्या आधारे या कंपन्यांमधून पात्र कंपन्यांची निवड केली जाईल. त्यानंतर निवड झालेल्या कंपन्यांना स्मारकासाठी ठरलेली जागा, शहरी रचना, निसर्गदृश्‍य आदी बाबी लक्षात घेऊन स्पर्धेसाठी विशिष्ट कालमर्यादेत "मास्टर प्लॅन' तयार करण्यास सांगितले जाईल. त्यानंतर या कंपन्यांना त्यांच्या संकल्पनेच्या आधारे निवड समितीसमोर सादरीकरण करण्यास सांगितले जाईल. मग समितीला जी संकल्पना सर्वोत्तम वाटेल, तिचीच स्मारकासाठी निवड केली जाईल, असे एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages