दुसर्‍या दिवशीही उल्हासनगर बंद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दुसर्‍या दिवशीही उल्हासनगर बंद

Share This
उल्हासनगर : 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह फोटो व मजकूर टाकण्यात आला असून याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोमवारी रात्रीपासूनच उल्हासनगरातील भीमसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, मंगळवारीदेखील या घटनेबाबत नागरिकांचा रोष कायम असल्याचे दिसून येत होते. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी उल्हासनगर व अंबरनाथमधील सर्वपक्षीय नेत्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून निवेदन दिले, तर रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नाना बागुल यांनीदेखील आपल्या पदाधिकार्‍यांसह पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी राठोड यांची भेट घेऊन आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची विनंती केली आहे.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात मध्य प्रदेशातून सचिन मेश्राम नावाच्या इसमाने 'जय भीम टाईम्स ऑफ इंडिया' या नावाचा उल्लेख करून आक्षेपार्ह फोटो व मजकूर फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर प्रकाशित केला होता. ही घटना उल्हासनगरातील एका भीमसैनिकाच्या लक्षात येताच त्याने या प्रकरणी तत्काळ विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ही घटना शहरात वार्‍यासारखी पसरताच हजारो भीमसैनिक रस्त्यावर उतरले. सोमवारी रात्री उल्हासनगरातील काही भागांमध्ये दगडफेकीच्या घटनादेखील घडल्या. या प्रकाराने उल्हासनगरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नाना बागुल, बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष जय गायकवाड, बसपाचे नगरसेवक विजय तायडे, भारिप नेते सारंग थोरात यांनी सोमवारी रात्री विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, मंगळवारी सकाळपासून नागरिकांचा रोष कायम दिसत होता. सकाळपासूनच उल्हासनगर शहरातील रिक्षा, दुकाने बंद ठेवण्यात आली होती. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे, शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर, सभागृह नेते धनंजय बोडारे, समाजसेवक अरुण आशान, बसपा नगरसेवक विजय तायडे, शैलेजा सोनताटे, अंबरनाथचे नगराध्यक्ष सुनील चौधरी, भारिप नेते सारंग थोरात, स्वाभिमान संघटनेचे रोहित साळवे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी विठ्ठलवाडी ठाण्यात जाऊन सर्वपक्षीय निवेदन दिले.

तसेच रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नाना बागुल, न्यू इंडिया ऑटोरिक्षा मेन्स युनियनचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो भीमसैनिकांनी पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी राठोड यांच्या कार्यालयात जाऊन त्यांनादेखील निवेदन सादर केले व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात भादंविसह कलम २९५ (अ) सह कलम माहिती व तंत्रज्ञान कायदा सन-२000 चे ६६ (अ), ६७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ते वादग्रस्त प्रोफ्राईल ब्लॉक करण्यात आले असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल तरी नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी राठोड यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages