उच्च न्यायालयात याचिका
मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवात होणार्या वीजचोरीला आळा घाला, त्यासाठी बेस्ट आणि महाराष्ट्र विद्युत महामंडळाच्या अधिकार्यांना प्रत्यक्ष जाऊन तपासणी करण्याचे आदेश द्या, अशी मागणी करणार्या जनहित याचिकेची शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली. या प्रकरणी न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठाने बेस्ट प्रशासन आणि वीज मंडळाला नोटीस बजावण्याचे आदेश दिले. वीजचोरीसंदर्भात केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.त्या याचिकेवर शुक्रवारी द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. मुंबई, पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवासाठी भव्य मंडप उभारून मोठय़ा प्रमाणावर विजेची रोषणाई केली जाते. यादरम्यान मोठय़ा प्रमाणात वीजचोरी होते. विजेच्या वापराच्या तुलनेत क्षुल्लक बिल भरले जाते आणि मोठय़ा प्रमाणावर महसूल बुडवला जातो. याकडे याचिकाकर्ते तिरोडकर यांनी उच्च न्यायालयाचे लक्ष वेधले. त्याची गंभीर दखल घेऊन न्यायालयाने बेस्ट आणि वीज मंडळाला नोटीस बजावून याचिकेची पुढील सुनावणी ३ सप्टेंबरपर्यंत तहकूब ठेवली.

No comments:
Post a Comment