मुंबई - अंधेरी येथील डी. एन. नगरमधील एका सोसायटीतील पुनर्विकासाच्या वादावरून आज पालिका मुख्यालयातील विकास नियोजन खात्याच्या कार्यालयात एका विकसकाला रहिवाशांनी चोप दिला. आझाद मैदान पोलिसांनी हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
या सोसायटीच्या पुनर्विकासाच्या वादावरून आज सायंकाळी विकास नियोजन खात्यात रहिवासी आणि विकसकादरम्यान वाद झाला. त्रस्त रहिवाशांनी पुनर्विकासासाठी दुसऱ्या बिल्डरचा पर्याय शोधण्याचा निर्णय घेतला; मात्र पहिल्या बिल्डरकडून पुनर्विकासात अडथळा आणणे सुरूच राहिले. त्या वेळी रहिवाशांच्या संतापाचा स्फोट झाला. विकास नियोजन खात्यात आज याबाबत सुनावणी होती. लोकांचा संताप अनावर झाल्याने पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी बिल्डरला विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता राजीव कुक्कनूर यांच्या कार्यालयात कोंडले. रहिवासी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी आझाद मैदान पोलिसांना पाचारण केले. या प्रकरणी सुनावणी घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर रहिवासी शांत झाल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.

No comments:
Post a Comment