मुंबई- कार्बनकोर, वंडरपॅच, जेटपॅचर अशा परदेशी तंत्रज्ञानांवर कोट्यवधी रुपये खर्च करूनसुद्धा शहरातील रस्ते खड्ड्यांतून बाहेर येत नसल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आता खड्डे बुजविण्यासाठी देशी तोडगा शोधून काढला आहे. याअंतर्गत टाकाऊ टायरपासून मिळणाऱ्या कार्बनच्या पावडरद्वारे खड्डेमय रस्त्यांची डागडुजी करण्यात येणार आहे. दादरमधील रस्त्यांवर हा प्रयोग करण्यात आला असून, तो यशस्वी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे पालिका कार्यालयात लागलेला हा शोध "युनो'मध्ये पाठविण्यात येणार आहे.
टाकाऊ टायरची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावल्यावर त्यातून मिळणाऱ्या कार्बन पावडरमध्ये खडी आणि डांबर मिसळून त्याद्वारे दादरमधील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले. त्यानंतर सातत्याने पाऊस पडूनही हे रस्ते अद्यापही खड्डेमुक्त आहे. मात्र पालिकेच्या जी/उत्तर कार्यालयाचे सहायक आयुक्त शरद उघडे आणि अभियंता प्रमोद भोसले यांच्या संशोधनातून हे तंत्रज्ञान तयार झाले आहे. यावर अजून संशोधन सुरू असून, ते पूर्ण झाल्यावर "युनो'ला पाठविण्यात येणार आहे. त्यास "युनो'कडून मान्यता मिळाल्यास हे संशोधन जगभरात वापरले जाऊ शकते.
महापौर सुनील प्रभू यांनी दादर परिसर; तसेच पूर्व उपनगरातील खड्डेदुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी उघडे व अभियंत्यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना याकामी प्रात्साहन देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. सभागृहनेते शैलेश फणसे, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे, रस्ते विभागाचे मुख्य अभियंता दत्तात्रय दीक्षित या वेळी उपस्थित होते.
पावसाळ्यापूर्वी मलेरिया रोखण्यासाठी 400 टायर जप्त करण्यात आले होते. हे टायर नंतर पालिकेची डोकेदुखी ठरू लागल्याने त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून त्यापासून कार्बन पावडर मिळवण्यात आली. या पावडरचा वापर करून खड्डे बुजविण्यासाठीचे मिश्रण तयार करण्यात आले. मिश्रणात कार्बनचा थर जमा होत असल्याने त्यातून पाणी आत झिरपत नाही. परिणामी रस्ता मजबूत बनतो, असे भोसले यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment