क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी पालिका व गेट्स फाऊंडेशनमध्ये करार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी पालिका व गेट्स फाऊंडेशनमध्ये करार

Share This
मुंबई : नव्याने निर्माण झालेला एमडीआर क्षयरोग कोणत्याही औषधांमुळे बरा होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडशेनने पुढाकार घेतला आहे. या क्षयरोगाच्या माहितीचे संकलन करून ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आली आहे. याबाबतचा सामंजस्य करार बुधवारी मुंबई मनपा - बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्यामध्ये करण्यात आला.

एमडीआर क्षयरोग म्हणजे मल्टिड्रग रेझिस्टंट ट्युबरक्युलोसिस अर्थात कोणत्याही औषधाला न जुमानणारा. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार २0१३ मध्ये एमडीआर क्षयाचे ३.७ टक्के रुग्ण आढळून आले आहेत. भारत, ब्राझील, रशिया, चीन, रशिया आणि दक्षिण आफ्रिकेत एमडीआर क्षयरोगाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. माल्डोवा या पूर्व युरोपातील देशात एमडीआर क्षयाचे प्रमाण एवढे वाढले आहे की देशाची आरोग्य व्यवस्था धोक्यात आली आहे. भारतात आणि विशेष करून मुंबईत गेल्या दोन वर्षांत एमडीआर क्षयामुळे काहीजणांचा मृत्यू ओढवला आहे. अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेवरही या क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले.

एमडीआर क्षयाची लक्षणे आणि उपचारांबाबत माहिती नसल्याने त्याचे उच्चाटन करण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्या पार्श्‍वभूमीवर मुंबई मनपाने बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या साहाय्याने एमटीआर क्षयाच्या उच्चाटनासाठी हातमिळवणी केली आहे. केंद्र आणि राज्य शासनानंतर अशा प्रकारचा सामंजस्य करार करणारी पहिली महापालिका होण्याचा मान मुंबई मनपाने मिळवला असल्याचे महापौर सुनील प्रभू म्हणाले. मुंबईतील क्षयरोग्यांची संख्या कमी करणे, हा फाऊंडेशनचा मुख्य उद्देश आहे. खाजगी क्षेत्रातील आरोग्य सेवा पुरवणार्‍या संस्था व रुग्णांना माहिती आणि तंत्रज्ञानाने जोडून त्याचा विस्तार करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे भारतातील अध्यक्ष गिरेड्री बिहारी यांनी सांगितले. एमडीआर क्षयाच्या उच्चाटनासाठी फाऊंडेशनचे सर्व प्रकारचे तांत्रिक साहाय्य मिळणार असून क्षयरुग्णांची डिजिटल नोंदणी करण्यात येणार असल्याचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages