मुंबई महानगर पालिकेच्या रस्त्यांवर पावसाळ्याच्या दरम्यान सतत पडणाऱ्या खड्ड्यांमुळे मुंबईकर नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी करोडो रुपये मंजूर केले जात असले तरी हा सर्व खर्च वाया जात आहे. हा पैसा मुंबईकर नागरिकांच्या खिश्यामधून कर रूपाने वसूल केलेला असतो. यामुळे मुंबई महानगर पालिके मधील सत्ताधारी आणि प्रशासनाविरोधात मुंबईकर नागरिकांच्या मनात तीव्र असंतोष पसरला आहे. मुंबईकर नागरिकांना खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाला वृत्तपत्र आणि वृत्त वाहिन्यांनी चांगलीच प्रसिद्धी दिल्याने पालिकेत गेले १७ वर्षे सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुंबईकरांकडे दिलगिरी व्यक्त करावी लागली आहे.
उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केल्या नंतर शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी पक्ष प्रमुखांच्या दिलगिरीची दखल घेणे गरजेचे असताना स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी राजीनामा नाट्य रंगवले. सतत ४ थ्या वेळा अध्यक्षपदी विराजमान होऊन हि शेवाळे यांना कंत्राटदारावर आपली पकड ठेवता आलेली नाही. यामुळे शेवाळे यांनी पदाचा राजीनामा दिला परंतु ठाकरे यांनी शेवाळे यांना झापले. राजीनामा देण्याचे हे दिवस नसून काम करून दाखवण्याचे दिवस असल्याचे ठाकरे यांनी शेवाळे यांना सांगितले आहे. एक दिवस आधी शेवाळे यांना झापले असतानाही शेवाळे आणि मुंबईचे महापौर सुनील प्रभू तसेच सेनेच्या सदस्यांनी धरण पाहणी दौऱ्यावर जाने पसंद केले. या पाहणी दौर्यावर जाण्यापेक्षा रस्त्यावरील खड्डे बुजवणे महत्वाचे असल्याचे माहित असूनही खास गटारी साजरी करण्यासाठी हा दौरा उरकून घेण्यात आला आहे.
या सर्व प्रकारावरून मुंबईकरांना खड्ड्यांनी त्रस्त केले असतानाही पालिकेतील सत्ताधारी मुंबईकर नागरिकांना किती महत्व देतात हेच मुंबईकर नागरिकांच्या समोर आले आहे. एकीकडे सत्ताधारी मुंबईकरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असताना मुंबईकरांच्या कर रुपी पैशांमधून पगार घेवून स्वताला अधिकारी म्हणवणाऱ्या पालिकेतील अधिकाऱ्यांची कंत्राटदाराबरोबर असलेल्या आर्थिक संबंधांमुळे मुंबईकरांना कोणीही वाली राहिलेला नाही असेच म्हणावे लागेल.
नवीन रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता चाचणी करण्यासाठी महापालिकेतर्फे ‘आयआयटी’ सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सल्लागार संस्था नेमल्या गेल्या आहेत. रस्ते बांधकामाच्या वेळी प्रत्येक थरावर कच्च्या मालाची गुणवत्ता तपासून रस्त्यांचे बांधकाम केले जाते. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी महापालिकेचे स्वतंत्र दक्षता विभाग आहेतच. त्यातच बांधकामाचा दर्जा तपासण्यासाठी ‘एसजीएस’ या सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु एवढे सल्लागार नेमूनही पहिल्याच पावसात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.
रस्त्यांवर कोणते मटेरियल वापरले जाते हे जरी महत्त्वाचा असले तरी कंत्राटदाराचे काम सुरू झाल्यानंतर त्या कामावर योग्य देखरेख ठेवणेही आवश्यक असते. महापालिकेच्या अभियंत्यांकडून कंत्राटदारांच्या कामावर लक्ष ठेवले जात नसल्यामुळे कंत्राटदारांकडून निकृष्ट दर्जाची कामे होतात. रस्त्यांचे डांबरीकरण असो वा खड्डे बुजवण्याचे काम असो, या दोन्ही कामांत ठरवून दिलेल्या नियम, शिफारशींप्रमाणे महापालिकेच्या अधिका-यांनी कंत्राटदारांकडून ते काम करून घ्यायला हवे. परंतु तसे होत नाही, त्यामुळेच मुंबईतील रस्त्यांवर वारंवार खड्डे पडतात असे समोर आले आहे.
रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी वंडर टेक्नॉलॉजिस, शौनक इन्फ्रास्ट्रक्चर, अताशा आशीर्वाद बिल्डर्स, हिंदुस्थान कोलास या कंपनीने उत्पादित केलेले कोल्डमिक्सचे तंत्र वापरण्यात येते. परंतु या उत्पादनाला महापालिकेने रस्त्यांच्या कामासाठी नियुक्त केलेल्या स्थायी तांत्रिक सल्लागार समितीने (स्टँक) मंजुरी दिलेली नाही. स्टँक समितीने या कंपनीने उत्पादित केलेल्या कोल्डमिक्सला प्रायोगिक तत्त्वावर खड्डे बुजवण्याचे काम देण्यात यावे आणि त्यांनी केलेल्या कामांचा अहवाल सादर करण्यात यावा, असे म्हटले होते. परंतु या कोल्डमिक्सद्वारे बुजवण्यात आलेल्या खड्डय़ांचा अहवाल स्टँक समितीला सादर करण्यात आलेला नाही.
मुंबईतील डांबरी रस्त्यांचे योग्य बांधकाम व्हावे म्हणून आठ वर्षापूर्वी स्टँक समितीची स्थापना केली गेली. त्यासाठी शिफारशी बनवण्यात आल्या. प्रत्येक रस्ता बनवताना थोडक्यात त्याची भौगोलिक रचना पाहूनच आराखडा बनवला जातो. या समितीच्या शिफारशी व निर्देशानुसार डांबरी रस्ते बनवले तर तेही मजबूत होतील असे स्टँक समितीचे म्हणणे आहे. मात्र स्टँक समितीने दिलेल्या शिफारशींची अंमलबजावणी केली जात नसल्याचे दृष्टीस आले आहे.
रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणारे कोल्डमिक्स तंत्र जुनेच आहे. परंतु हॉटमिक्सच्या जागी पुन्हा हे तंत्र आणण्यात आले. परंतु ज्या वेळी हे तंत्र वापरले जाते. तेव्हा त्या तंत्राने कशाप्रकारे खड्डा बुजवला जावा, याचीही एक पद्धत असते. हॉटमिक्स असो वा कोल्डमिक्स, रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी या तंत्राचा वापर करताना खड्डय़ांच्या तळभागात काय घातले जाते, हे महत्त्वाचे आहे. हे काम करण्यासाठीही एक विशिष्ट पद्धत आहे. या पद्धतीनुसारच कामे होणे गरजेचे असते. मात्र, संबंधित कंत्राटदाराला कंपनीने हे तंत्र वापरण्याची पद्धतच शिकवली नसेल तर खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे होणारच तसेच त्यासाठीचा खर्चही खड्डय़ातच जाणार. त्याचाच नमुना मुंबईतील खड्डे बुजवण्याच्या कामात दिसून येतो.
मुंबईतील रस्त्यांवरील खड्डय़ांबाबत सत् ताधारी पक्ष तत्कालीन अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता यांच्यावर खापर फोडत असले तरी प्रत्यक्षात या खड्डय़ांना महापालिकेचे अभियंतेच जबाबदार असल्याचे उघड होत आहे. मुंबईचे रस्ते खड्डय़ात गेल्याचे खापर एसजीएस कंपनीवर फोडून सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीने थर्ड पार्टी ऑडिटच बंद पाडले आहे. याचा समाचार घेण्यासाठी मुंबई विभागीय काँग्रेस समितीच्या शिष्टमंडळाने आयुक्त सीताराम कुंटे यांची पालिका मुख्यालयात भेट घेतली आहे. काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत रस्त्यांच्या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याची जोरदार मागणीही केली आहे. त्यानुसार रस्त्यांच्या देखरेखीसाठी तीन कंपन्यांचे पॅनलच उभे करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. या पॅनल कडून दोषी ठरवणाऱ्या कंत्राटदार, अभियंते यांच्यावर पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी कोणाचीही पर्व न करता कारवाही सुरु केल्यास येणाऱ्या काळात मुंबईमध्ये खड्डे मुक्त रस्ते दिसू शकतात यात शंका नाही.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३

No comments:
Post a Comment