पूर्व मुक्त मार्गाचा दुसरा टप्पा डिसेंबरमध्ये खुला होण्याची चिन्हे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पूर्व मुक्त मार्गाचा दुसरा टप्पा डिसेंबरमध्ये खुला होण्याची चिन्हे

Share This
मुंबई - दक्षिण मुंबई ते चेंबूरपर्यंतचा प्रवास अत्यंत जलद करणारा पूर्व मुक्त मार्गाचा (ईस्टर्न फ्री-वे) पहिला टप्पा 13 जूनला सुरू झाला. आता चेंबूर ते घाटकोपरपर्यंतचा प्रवास सुकर करणारा दुसऱ्या टप्प्यातील मार्गही डिसेंबरमध्ये सुरू होण्याची चिन्हे आहेत. 

ईस्टर्न फ्री-वेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम आणि लायनिंग ऑगस्टअखेर पूर्ण होणार असून संपूर्ण बोगदा डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर 2.81 किलोमीटरचा पांजरपोळ-घाटकोपर जोडरस्ताही डिसेंबरमध्येच पूर्ण होणार असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पी. डी.मेलो रोड (वाडीबंदर)- आणिक-पांजरपोळ-घाटकोपर अशा 16.09 किलोमीटर अंतराच्या पूर्व मुक्तमार्ग प्रकल्पात आणिक येथील दोन बोगदे अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते देशातील शहरी भागातील सर्वात मोठे बोगदे ठरणार आहेत. एका बोगद्याचे काम पूर्ण झाल्यावर एमएमआरडीएने 13 जूनला वाडीबंदर ते आणिकपर्यंतचा पहिला टप्प्यातील मार्ग मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन करून वाहनांसाठी खुला केला. या मार्गावरून दररोज हजारो वाहने विनासिग्नल आणि विनाटोल धावत आहेत. 

दुसरा बोगदा आणि पांजरपोळ-जोडरस्त्याचे काम डिसेंबरमध्ये पूर्ण होईल. मलनिस्सारण, रस्ता, विद्युतीकरण आणि व्हेंटिलेशन आदी कामेही डिसेंबरमध्येच पूर्ण होतील, अशी माहिती एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त अश्‍विनी भिडे यांनी दिली. दुसऱ्या टप्प्यातील मार्ग सुरू झाल्यानंतर पूर्व उपनगरे, ठाणे आणि नाशिकच्या दिशेने प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी व्यक्त केली. या मार्गामुळे वाहनचालकांना पूर्व द्रुतगती महामार्गाशिवाय आणखी एक चांगला पर्याय उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages