मुंबई : मुंबई शहरासह संपूर्ण राज्यात क्षयरोगासाठी प्रतिबंधात्मक अशी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी शासकीय व खाजगी तज्ज्ञांचा समावेश असलेला अभ्यास गट नेमण्यात येणार आहे. तसेच एमडीआर क्षयरुग्णांसाठी वैयक्तिक उपचार आणि रुग्णनिहाय त्वरित उपचारासाठी मार्गदर्शक तक्ता तयार करण्यासाठी तज्ज्ञांचा अभ्यास गट नेमण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी येथे दिली.
मुंबईत क्षयरुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मंत्रालयात बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. याबाबत अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री शेट्टी म्हणाले की, केंद्र शासनाच्या सहकार्याने राज्यात क्षयरोग निर्मूलनासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. मुंबई शहरात झोपडपट्टय़ांतील लोकसंख्येचे प्रमाण अधिक असून क्षयरोगाचा फैलाव मोठय़ा प्रमाणावर होऊ नये त्यासाठी अधिक प्रभावी अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यासाठी शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञांचा अभ्यास गट नेमण्यात येणार आहे. क्षयरोगावर उपचारापेक्षा प्रतिबंध कसा करता येईल, याबाबत अभ्यासगट मार्गदर्शन करणार आहे. मुंबईतील रुग्णांची संख्या लक्षात घेता त्यांचे निदान व उपचारासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणार्या संस्थांच्या सहाकार्याने एक स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यात येईल.
शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातून ४0 लाख रुपये देण्यात येतील, गरज पडल्यास अधिकचा निधीही या रुग्णालयाच्या सक्षमीकरणासाठी देण्यात येईल, असेही शेट्टी यांनी या वेळी सांगितले. जे.जे. समूह रुग्णालयातील क्षयरोग प्रयोगशाळेत आधुनिक यंत्रसामग्री बसविण्याकरिता ४0 लाख रुपये आरोग्य विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

No comments:
Post a Comment