ज्येष्ठ छायाचित्रकार गजानन घुर्ये यांची आत्महत्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ज्येष्ठ छायाचित्रकार गजानन घुर्ये यांची आत्महत्या

Share This

ghurye


ज्येष्ठ छायाचित्रकार गजानन घुर्ये (५८) यांनी त्यांच्या दादर येथील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आज पहाटे त्यांनी गळफास घेतला. त्यांनी नैराश्येतून हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दादरमधील शिवसेना भवनजवळ असलेल्या साईचरण या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर घुर्ये कुटुंबियांसह राहत होते. आज पहाटे त्यांनी बेडरुममध्ये ओढणी पंख्याला बांधून गळफास घेतला. सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार पाहून कुटुंबियांना धक्काच बसला. त्यानंतर तातडीने पोलिसांना कळविण्यात आले. याबाबत अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. घुर्ये गेल्या काही दिवसांपासून निराश होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितल्याचे झोन-५ चे पोलीस उपायुक्त डी. आर. कुळकर्णी यांनी 'मटा ऑनलाइन'शी बोलताना स्पष्ट केले.

३५ वर्षांहून अधिक काळ छायाचित्रकलेची सेवा
गजानन घुर्ये हे महाराष्ट्रातील एक राजकीय छायाचित्रकार म्हणून परिचित होते. ३५ वर्ष त्यांनी छायाचित्रकलेची सेवा केली. सगळ्याच राजकीय नेत्यांशी त्यांचे अगदी जवळचे संबंध राहिले. वसंतदादा पाटील यांच्यापासून ते शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे अशा सर्वच मुख्यमंत्र्यांच्या ते खास मर्जीतले होते. एखादी राजकीय सभा असेल किंवा समारंभ असेल तर त्याच्या छायाचित्रणाची जबाबदारी एका विश्वासाने घुर्ये यांच्याकडे दिली जायची. जसे राजकारण्यांना घुर्ये जवळचे वाटायचे तसाच ग्रामीण भागातील अनेक वर्तमानपत्रांनाही घुर्येंचा आधार वाटायचा. एखाद्या राजकीय वा शासकीय कार्यक्रमाचा फोटो कुठेही नसला तरी हमखास तो घुर्ये यांच्याकडून त्यांना मिळत होता. 'जीजीपिक्स' (ggpics.com) या नावाने त्यांनी रोजच्या कार्यक्रमांची छायाचित्रे उपलब्ध करून देणारी स्वत:ची वेबसाइटही सुरू केली होती. स्वत: छायाचित्रकार म्हणून दबदबा निर्माण करणाऱ्या घुर्ये यांनी अनेक छायाचित्रकारही घडवले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages