मुंबई - महिला छायाचित्रकारावरील सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना आज (शनिवार) मुंबई सत्र न्यायालयाकडून 30 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला आज पहाटे अटक करण्यात आली होती. या प्रकरणी अद्याप तीन आरोपी फरार आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी अब्दुल सत्तार आणि विजय जाधव या दोन आरोपींना अटक केलेली आहे. या दोघांनाही आज न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली. गुरूवारी झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर पोलिसांनी एकाला महालक्ष्मी परिसरातून अटक केली, तर दुसऱ्या आरोपीला आज पहाटे महालक्ष्मी परिसरातून अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला एन. एम. जोशी पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले होते. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही आज पहाटे पोलिस ठाण्यात गेल्याचे वृत्त होते. या गुन्ह्यातील अन्य आरोपींचीही ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींची रेखाचित्रे तयार केली आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची 20 पथके तयार आहेत. या घटनेतील पीडित महिला छायाचित्रकाराची प्रकृती स्थिर आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे, पोलिसांनी सांगितले.
अनेक वर्षे पडीक असलेल्या महालक्ष्मी येथील श्रीशक्ती मिल कम्पाऊंडमध्ये गुरूवारी सायंकाळी सहाच्या सुमारास महिला छायाचित्रकारावर बलात्कार झाला. या कम्पाऊंडमध्ये आपल्या सहकाऱ्यासोबत पीडित तरुणी छायाचित्रणासाठी गेली. मिल कम्पाऊंडमध्ये बसलेल्या 20 ते 22 वर्षे वयाच्या दोघा तरुणांनी त्यांना अडविले. या जागेत यायला मनाई असताना तुम्ही येथे कसे आलात, अशी विचारणा करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी "काही दिवसांपूर्वी येथे खून झाला होता, तो खून तुम्ही केला का, तुमची चौकशी करावी लागेल', असा दम भरला. आरोपींनी महिला छायाचित्रकार आणि तिच्या सहकाऱ्याला चौकशीच्या बहाण्याने वेगळे केले. त्यानंतर महिला छायाचित्रकाराचे हात पट्ट्याने बांधून तळमजल्यावर मोकळ्या जागेत नेले, तर तिच्या सहकाऱ्याला झाडाला बांधून ठेवले. यानंतर तेथे असलेल्या चौघांनी या महिला छायाचित्रकारावर आळीपाळीने बलात्कार केला. एवढ्यावर न थांबलेल्या या चौघांनी आपल्या आणखी एका साथीदाराला या ठिकाणी मोबाईलवर फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर त्यानेही बलात्कार केला. या अतिशय पाशवी कृत्यानंतर ते पाचही आरोपी तेथून पळून गेले. जखमी अवस्थेतील या महिला छायाचित्रकाराला जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.

No comments:
Post a Comment