रोडरोमियोच्या त्रासामुळे आदिवासी विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रोडरोमियोच्या त्रासामुळे आदिवासी विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित

Share This
वज्रेश्‍वरी : रोडरोमियोच्या सततच्या त्रासाला कंटाळलेल्या आदिवासी विद्यार्थिनीच्या पालकांनी तिला शाळेत पाठवणेच बंद केल्याचा खळबळजनक प्रकार पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. भिवंडी तालुक्यात ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांत तक्रार केल्यानंतरदेखील पोलिसांनी या रोडरोमियोवर कोणतीही कारवाई न केल्याने अखेर या प्रकरणी पीडित मुलीला न्याय मिळावा, यासाठी आता तिच्या पालकांनी येथील आदिवासी विकास संस्थेचे अध्यक्ष दशरथ वळवी यांना साकडे घातले आहे.

तालुक्यातील पच्छापूर येथील शाळेत इयत्ता आठवीत शिकणारी पीडित विद्यार्थिनी शाळेत येत-जात असताना ४ महिन्यांपूर्वी याच परिसरातील दहिगावातील पप्पू ऊर्फ राजेंद्र बोंडे याची नजर तिच्यावर पडली. तेव्हापासून पप्पू ती विद्यार्थिनी ज्या वेळेत शाळेत जाते व शाळेतून येते त्या वेळेत तिची छेड काढू लागला. मात्र ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत शाळेत ये-जा करत आपले शिक्षण घेत होती. या मुलीकडून कोणताच प्रतिसाद येत नसल्याचे पाहून या रोडरोमियोने तिला आणखीनच त्रास द्यायला सुरुवात केली. अखेर तिला पप्पूचा त्रास असह्य झाल्याने तिने याबाबत आपल्या पालकांना सांगितले. त्यावर तिच्या पालकांनी २९ जुलै रोजी पडघा पोलीस ठाणे गाठून या गंभीर प्रकरणाची तक्रार पोलिसांत दिली, मात्र त्याचा काही एक उपयोग झाला नाही. पोलिसांनी पप्पूवर कोणतीच कारवाई न केल्याने पप्पूला रान मोकळे झाले व तो या विद्यार्थिनीला आणखीच छळू लागला. हे पाहून अखेर या आदिवासी विद्यार्थिनीच्या पालकांनी तिला शाळेत पाठवणेच बंद केले. त्यानंतर ३0 जुलै रोजी पप्पू हा त्याच्या ४-५ मित्रांना घेऊन थेट तिच्या शाळेत गेला व तिला शोधू लागला; परंतु तिने शाळेत जाणेच बंद केल्याने तिच्यावरील अनर्थ टळला. हे सत्य असले तरी पप्पूच्या या गुंडगिरीमुळे एका हुशार आदिवासी मुलीला शिक्षणापासून कायमचे वंचित राहण्याची वेळ आली, हे मात्र नक्की. एकीकडे देशभरात महिला मुलींना संरक्षण देण्यासाठी शासन सर्व पातळीवर तयारी करत असताना भिवंडी तालुक्यात एका रोडरोमियोच्या छळामुळे एका विद्यार्थिनीला शाळा सोडावी लागत आहे व पोलीस त्या रोडरोमियोवर काही एक कारवाई करत नाहीत. याबाबत सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. दरम्यान, पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी येथील आदिवासी विकास संस्थेचे अध्यक्ष दशरथ वळवी यांना साकडे घातल्यानंतर त्यांनी शाहू- फुले-आंबेडकर यांच्या देशात अशी घटना घडावी, यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय? अशी प्रतिक्रिया दिली. त्याचप्रमाणे संबंधितावर कारवाई केली जावी, अशी मागणीही तिच्या पालकांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages