शिक्षक हा समाजाचा निर्माणकर्ता - डॉ. प्रकाश देशमुख - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शिक्षक हा समाजाचा निर्माणकर्ता - डॉ. प्रकाश देशमुख

Share This

मुंबई : माहिती-तंत्रज्ञानाच्या या युगात एकीकडे वेगवान पिढी आपल्या कर्तृत्वाने उच्च शिखरे सर करत आहे. नवा इतिहास घडवत आहे. भौगोलिक बदल, वैज्ञानिक शोध लावत आहे. एकूणच सामाजिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक, भौगोलिक परिवर्तनात या पिढीचा सिंहाचा वाटा आहे, तर दुसरीकडे संस्कारविरहित पिढी उदयास येत आहे. या भरकटत जाणार्‍या पिढीवर चांगले संस्कार करण्याची प्रथम जबाबदारी ही शिक्षकाची आहे आणि जोपर्यंत शिक्षक ही यंत्रणा कार्यरत आहे तोपर्यंत समाजावर संस्कार होत राहणार. शिक्षक हा समाजाचा निर्माणकर्ता आहे. राष्ट्र उभारणीच्या कार्यात शिक्षकाचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन मुक्त विद्यापीठाच्या मुंबई विभागीय केंद्राचे विभागीय संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांनी केले.

शिक्षक दिनानिमित्त मुंबई विभागीय केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पोद्दार महाविद्यालयाच्या कल्पना परब, आचार्य मराठे महाविद्यालयाच्या नीलिमा सावंत, आएशाबाई उर्दू महाविद्यालयाच्या रेश्मा शेख या शिक्षिकांना मानपत्र, साहित्य व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला, तर विद्यापीठाचे जयदास बटवले, अनिता सकुंडे, हरीष मुने यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मुक्त विद्यापीठाच्या अभिनव शिक्षणक्रमांचा मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील विद्यार्थी लाभ घेत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये मुक्त विद्यापीठाची वाढती लोकप्रियता पाहता यंदाचे वर्ष गुणवत्ता वर्ष म्हणून साजरे करणार असल्याचेही डॉ. प्रकाश देशमुख म्हणाले. विद्यार्थ्यांना शिक्षणाची अधिकाधिक संधी प्राप्त व्हावी म्हणून विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव विद्यापीठाने १६ सप्टेंबरपर्यंत प्रवेशाची मुदत वाढवली असल्याचेही त्यांनी या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले. दरम्यान, रागिणी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. या वेळी विद्यापीठाचा कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग व शिक्षक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages