निवडणुकीत "पीआर'चा प्रचारात वाढता प्रभाव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

निवडणुकीत "पीआर'चा प्रचारात वाढता प्रभाव

Share This
मुंबई - यंदा लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या पद्धतीत मोठा बदल घडून आला आहे. बहुतेक उमेदवारांनी "इलेक्‍शन वॉर रूम'ची जबाबदारी व्यावसायिक "पब्लिक रिलेशन्स एजन्सीं'ना दिली आहे. या जनसंपर्क संस्था प्रचाराशी निगडित सर्व बाबींची काटेकोर आखणी करीत आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियाचाही मोठा बोलबाला सुरू आहे. 

सर्व प्रमुख पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी अत्याधुनिक प्रचारतंत्र आणि अद्ययावत साधनांचा वापर चालविल्याचे दिसते. अनेक उमेदवारांनी अग्रगण्य "इव्हेंट मॅनेजमेंट' कंपन्यांची सेवा घेतली आहे. मतदारांच्या घरी जाऊन पत्रके देणे, एसएमएस आणि आणि ई-मेल पाठवणे, अशी कामे पीआर एजन्सी करत आहेत. प्रचारासाठी ट्‌विटर, फेसबुक, व्हॉट्‌स ऍप अशा सोशल नेटवर्किंग माध्यमांचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. उमेदवाराने कधी, कोठे बैठका, चौकसभा घ्याव्यात; पदयात्रा, मिरवणुका काढाव्यात, याचे नियोजन जनसंपर्क संस्था करत आहेत. या संस्थांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या विभागांत जाऊन जनमताचा कानोसा घेतात आणि त्यानुसार आपल्या "क्‍लायंट'ना मार्गदर्शन करतात.

उमेदवाराच्या दैनिक खर्चावर नजर ठेवण्यासह निवडणूक आयोगाच्या निर्देशांशी संबंधित कामेही पीआर एजन्सीचे कर्मचारी काटेकोरपणे करताना दिसतात. उमेदवाराच्या "बजेट'नुसार मुद्रित आणि इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांत नेत्यांच्या बातम्या, छायाचित्रे झळकवणे, त्यांची भाषणे तयार करून देणे आदी कामांना गती आली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages