मुंबई : येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सोने आणि अमली पदार्थांच्या तस्करीत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर सीमाशुल्क विभागाने स्वतंत्र डेटा सर्व्हरची मागणी केली आहे. इमिग्रेशन प्राधिकरणाकडे उपलब्ध असलेल्या विमान प्रवाशांच्या सविस्तर माहितीची साठवण करण्यासाठी स्वतंत्र सर्व्हर तसेच संशयितांना ताब्यात घेण्यासाठी अतिरिक्त तीन श्वानांची सीमाशुल्क विभागाला आवश्यकता आहे.
इमिग्रेशन प्राधिकरणाकडे सध्या असलेल्या डेटा सर्व्हरमध्ये भारतात येणार्या तसेच येथून परदेशात जाणार्या प्रत्येक विमान प्रवाशाची सविस्तर माहितीची साठवण केली जाते. हवाई सुरक्षा आणि संरक्षणासाठी ही माहिती गरजेची आहे. तथापि, सोन्याचे दागिने आणि अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या सीमाशुल्क विभागाला अद्याप स्वतंत्र सर्व्हर देण्यात आलेला नाही. जर आपल्याकडे स्वतंत्र डेटा सर्व्हर असेल तर लाखो प्रवाशांमधून तस्करी करणार्या संशयित प्रवाशांना जाळ्यात पकडणे सोपे जाईल, असे सीमाशुल्क विभागातील एका वरिष्ठ अधिकार्याने रविवारी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
मुंबई विमानतळावर वर्षभरात जवळपास ३ कोटी ४0 लाख प्रवासी ये-जा करतात. आशिया खंडातील वर्दळीच्या विमानतळांपैकी हे एक विमानतळ आहे. सद्यस्थितीत येथील सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्यांना गुप्तचर यंत्रणेकडील माहिती तसेच तंत्रज्ञानावर अवलंबून राहावे लागते. सध्या या विभागाकडे सात श्वान आहेत. पण, मागील वर्षभरात तस्करीच्या घटनांत झालेली वाढ विचारात घेतल्यास आपल्या ताफ्यात आणखी तीन श्वानांची गरज आहे. यासंदर्भात वरिष्ठ प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती एका अधिकार्याने दिली. वास्तविक, आंतरराष्ट्रीय विमानतळ, एअर कार्गो आणि फॉरेन पोस्टल डिपार्टमेंटसाठी जवळपास २0 श्वानांची आवश्यकता असल्याचे संबंधित अधिकार्याने स्पष्ट केले.

