आंबेडकर यांचे गोडवे गाण्याचा मोदी यांना अधिकार नाही - भालचंद्र मुणगेकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आंबेडकर यांचे गोडवे गाण्याचा मोदी यांना अधिकार नाही - भालचंद्र मुणगेकर

Share This

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मतांसाठी गोडवे गाण्याचा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना कोणताही अधिकार नाही. मोदी यांनी आपल्या एका पुस्तकात दलितांचा मानसिकदृष्ट्या पंगू असल्याचा उल्लेख केलेला आहे, असा आरोप काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

दलितांबाबत आतापर्यंत काँग्रेसनेच अनेक विकासाच्या योजना आणल्या, त्यामुळे मोदींना काँग्रेसवर टीका करण्याचा अधिकार नाही. केवळ मतांसाठी मोदी हे आंबेडकरांचा मुद्दा घेऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. नरेंद्र मोदी यांनी २००७मध्ये 'कर्मयोगी' नावाचे पुस्तक लिहिले. त्यात दलितांना 'मानसिकदृष्ट्या पंगू' असे संबोधण्यात आले आहे. यावरून मोदी यांची दलितांबद्दलची मानसिकता दिसून येते, भाजप हा कोणत्या वर्गाचे प्रतिनिधित्व करतो, हे दलित जनतेला चांगले ठाऊक आहे. स्वार्थासाठी निवडणुकीतील मुद्दे बदलायचे, त्यांचा वापर झाला की आधीचे मुद्दे सोडून द्यायचे, ही भाजपची जुनी सवय आहे, असे मुणगेकर यांनी सांगितले.


भाजपचे नेते अरुण शौरी यांच्या एका पुस्तकात देशाच्या घटनानिर्मितीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे श्रेय हिसकावून घेण्यात आले होते. काँग्रेस नेहमीच दलितांच्या बाजूने उभी राहिली आहे. त्यामुळे दलित जनता मोदींच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असे मुणगेकर यांनी सांगितले. मुस्लिम आणि दलित समाजाच्या मतांसाठी मोदी आता कोणत्याही थराला जात आहेत. रामदास आठवले यांना केवळ खासदारकी हवी होती. म्हणून ते शिवसेना-भाजपसोबत गेले, त्यामुळे दलित जनतेच्या कल्याणाचे आठवले यांनाही काही पडलेले नाही. त्यामुळे आठवले गेले म्हणून दलित जनता महायुतीसोबत जाणार नाही, असे मुणगेकर म्हणाले.


Post Bottom Ad

JPN NEWS

Pages