आंबेडकर सर्वार्थाने राष्ट्रीय नेते - नरेंद्र जाधव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आंबेडकर सर्वार्थाने राष्ट्रीय नेते - नरेंद्र जाधव

Share This

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वार्थाने राष्ट्रीय नेते होते असे प्रतिपादन नियोजन आयोग सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले. अंधेरीमधील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्रातर्फे डॉ. आंबेडकर जयंती साजरी झाली. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. इंग्लंडमधील आंबेडकरी चळवळीचे प्रणेते हरबंस विर्दी, केंद्राचे अध्यक्ष डी. आर. भालेराव, उपाध्यक्ष चंद्रकांत बच्छाव, सरचिटणीस रत्नाकर रीपोटे, उपसरचिटणीस नितीन सोनावणे, चिटणीस नीना हरिनामे, खजिनदार हिरामण शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 
समाजाला ज्ञान मार्गावर नेण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले आहे, असे जाधव म्हणाले. बाबासाहेबांनी महिलांच्या सबलीकरणासाठी विशेष पुढाकार घेतला. राज्यांच्या पुनर्ररचनेबाबत त्यांनी कार्य केले. परंतु त्यांच्या कामगिरीची दखल कोणीच घेतली नाही याबाबत जाधव यांनी खंत व्यक्त केली. सेवायोजन केंद्र सुरु करणे, नद्या जोडणी प्रकल्प आदी कल्पना आंबेडकरांच्याच होत्या. ही कार्ये करत असताना दलित वर्गाला त्यांनी डोळ्यासमोर समोर ठेवले नव्हते तर ती राष्ट्रीय कामगिरी होती अशी माहिती त्यांनी दिली. 

महिलांच्या सबलीकरण करण्यासाठी हिंदू कोड बिल आंबेडकरांनी संसदेत मांडले होते. कित्येक वर्षे ते संमत न झाल्याने त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता याची आठवण जाधव यांनी केली. त्यांच्याबद्दल आपल्या मनात भक्तीभाव आहे त्याचे शक्तीत रुपांतर करायचे असेल तर त्यांचे विचार समजून घ्यावयास हवेत असा सल्ला त्यांनी दिला. आंबेडकरांनी त्याकाळी मांडलेल्या काही कल्पना आज पूर्णत्वास येत आहेत; तर उरलेल्या कल्पनांची दाखल येत्या काही वर्षांत सरकारला घ्यावी लागेल असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला. यावेळी फेसबुक आंबेडकराईट मुवमेंट च्या युवकांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीते सादर केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages