आव्हाने पेलण्यास मुंबई अग्निशमन दल समर्थ - कुंटे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आव्हाने पेलण्यास मुंबई अग्निशमन दल समर्थ - कुंटे

Share This
मुंबई : मुंबईतील उंच इमारतींची वाढती संख्या, झोपड्यांमधील अरुंद जागांमधून वाट काढत घटनास्थळी पोहोचण्याची कसरत अशा एक ना अनेक किचकट आव्हानांचा सामना आग शमवताना करावा लागतो, अशी आव्हाने पेलण्यासाठी मुंबई अग्निशमन दल सक्षम आणि समर्थ आहे आणि या सार्मथ्यामध्ये वाढ होण्यासाठी महापालिका उपाययोजना करत आहे, असे महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सांगितले. देशात सार्ज‍या होणार्‍या अग्निशमन सेवा दिनानिमिंत्त आणि अग्निशमन सेवा बजावताना वीरगती प्राप्त झालेल्या जवानांच्या कार्याचे यथोचित व प्रेरणादायी स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा विशेष कार्यक्रम भायखळा येथील मुंबई अग्निशमन दलाच्या केंद्रातील प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. 
मुंबई अग्निशमन दल सक्षम होण्यासाठी महापालिका उपाययोजना करत आहे. यात मनुष्यबळ प्रशिक्षण, संघ भावना या बाबींवरही अद्ययावत तंत्राचा अवलंब केला जात आहे. अग्निशमन तरतूदींचे व नियमावलींचे काटेकोर पालन केल्यास बर्‍याच गोष्टी साध्य करता येतील, असे कुंटे म्हणाले. १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई बंदरात व्हिक्टोरिया गोदीतील एक क्रमांकाच्या धक्क्याला लागलेल्या 'एम.एस. फोर्ट स्टिकिन'या बोटीवर ठेवलेल्या दारुगोळ्याने पेट घेतला. त्या वेळी लागलेल्या भीषण आगीशी झुंज देताना मुंबई अग्निशमन दलातील ६६ अधिकारी व जवान मृत्युमुखी पडले होते. त्यांचे सदैव स्मरण राहावे, यासाठी हा दिवस 'अग्निशमन सेवा दिन' म्हणून पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने १९६८मध्ये घेतला. त्यानुसार, अग्निशमन दलाच्या केंद्रातील प्रांगणात स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

१४ ते २0 एप्रिलपर्यंत अग्निशमन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून मुंबईतील उत्तुंग इमारती, झोपड्या, औद्योगिक वसाहती, शाळा आणि महाविद्यालये येथे लोकशिक्षण आणि जनजागृती करण्याचा निर्धार पालिकेने केला आहे. अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचारी यांना मिळून आतापर्यंत सात राष्ट्रपती अग्निशमन सेवा शौर्यपदक, ३२ अग्निशमन सेवा शौर्यपदक आणि १0३ महापालिका आयुक्तांचे रजक पदक मिळाले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages