मुंबई / अजेयकुमार जाधव
बौद्ध तरुणांना मारहाण करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि घाटकोपर पश्चिम येथील आमदार राम कदम यांच्यावर कारवाही करावी या मागणीसाठी कदम यांच्या घरावर रविवारी काढण्यात येणारा मोर्चा रद्द करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आमदार कदम यांनी आपल्या घाटकोपर येथील घरात बुद्धाच्या अस्थी दर्शनासाठी आणल्याचा दावा केला होता. या अस्थी बुद्धाच्या नसल्याचे भारिपच्या कार्यकर्त्यांनी म्हटल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांशी त्यांची बाचाबाची झाली होती. भारिपचे रोहित तांबे, रवींद्र मारे, रितेश लांडगे जखमी झाले होते. यानंतर कदम यांच्यावर अट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही राम कदम यांना अटक केली जात नसल्याने विक्रोळी सूर्या नगर येथील बौद्ध बांधवानी मोर्चाचे आयोजन केले होते.
परंतू मोर्चा निघायच्या आधी रात्री अडीच वाजता पोलिसांनी किरण पवार, प्रशांत चव्हाण, संतोष शरणागत, सुधीर कसबे, भीमराज जगताप, प्रकाश मोरे, सुमित साळुंखे या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या. दरम्यान वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश सकपाळ यांनी अटक केलेल्या सर्व तरुणांना सोडण्याचे आश्वासन दिले.
तसेच भारिपचे प्रकाश आंबेडकर व रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून राम कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कदम यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयामध्ये सदर प्रकरण सुरु असल्याने सर्व बौद्ध धर्मियांनी शांतता पाळावी असे आवाहन केले. प्रकाश आंबेडकर व आनंदराज आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बौद्ध धर्मियांनी मोर्चा स्थगित केला असला तरी येणाऱ्या काळात राम कदम यांच्यावर कारवाही झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

