चेंबूरमध्ये सर्वाधिक धोकादायक इमारती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

चेंबूरमध्ये सर्वाधिक धोकादायक इमारती

Share This
मुंबई : गतवर्षी डॉकयार्ड रोड येथे ६१ रहिवाशांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या 'आफताब मंजिल'सारख्या शेकडो इमारती आजच्या घडीला तग धरून आहेत. अशा मोडकळीस आलेल्या इमारतींचे प्रमाण एम-वेस्ट वॉर्डातील चेंबूर, देवनार भागात सर्वाधिक असल्याची माहिती उजेडात आली आहे. या भागांत ६९ धोकादायक इमारती आहेत, तर दुसर्‍या स्थानावरील भायखळा भागात ४९ इमारती मोडकळीस आल्या आहेत. ३0 वर्षांहून अधिक काळ आयुर्मान झालेल्या सर्व इमारतींना 'स्ट्रक्चरल ऑडिट' करण्याचे निर्देश देत बृहन्मुंबई महापालिकेने नोटिसा बजावल्या. यासंदर्भातील सर्वेक्षणातून शहरात मोडकळीस आलेल्या इमारतींची संख्या जवळपास ४00 च्या घरात असल्याचे उघडकीस आले आहे.
गेल्या वर्षी घडलेल्या डॉकयार्ड रोड येथील इमारत दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने धोकादायक इमारतींचा प्रश्न गांभीर्याने विचारात घेतला होता. पालिकेने आपल्या इमारतींचेही स्ट्रक्चरल ऑडिट सुरू केले आहे. हे ऑडिट पूर्ण करणार्‍या इमारतींपैकी जवळपास ४00 इमारती केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. आणखी काही इमारतींच्या अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. या धोकादायक इमारतींत सर्वाधिक ६९ इमारती चेंबूर, देवनार भागातील आहेत. त्यापाठोपाठ भायखळ्यातील ४९ तर मलबार हिल परिसरातील ३0 धोकादायक इमारतींचा समावेश आहे. शहरात ३0 वर्षांहून अधिक काळ आयुर्मान असलेल्या जवळपास ३५ हजार इमारती आहेत. यापैकी जवळपास ५00 खाजगी इमारतींनी पालिकेच्या नोटिशीला प्रतिसाद देत स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे तर अनेक प्रकरणांत रहिवाशांनी अद्याप पालिकेकडे आपल्या इमारतीचा अहवाल सादर केलेला नाही. खाजगी धोकादायक इमारतींत वास्तव्य करणार्‍या सर्व रहिवाशांना जागा सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत; परंतु अनेक इमारतींतील रहिवासी आपले घर खाली करण्यास तयार नसल्याने पालिका न्यायालयात जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages