मुकेश श्रीकृष्ण धावडे, वडाळा, ता.29
कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे योगगुरू रामदेवबाबा यांनी नुकतेच राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. "राहुल गांधी दलितांच्या घरी हनीमून आणि सहलीसाठी जातात,' त्यांच्या या वक्तव्यावरून देशभर खळबळ उडाली होती. या आक्षेपार्ह विधान केल्यानंतर ठिकठिकाणी जोरदार टीका झाल्याने योगगुरू रामदेवबाबा यांना अखेर माफी मागावी लागली. असून त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. मात्र दलित बांधवांची मने दुखावली गेली असल्याने अजूनही अनेक ठीकणी रामदेवबाबा यांच्या विरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. याच निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर (ता.29) रोजी अविष्कार सामाजिक प्रतिष्ठान व लक्ष स्पोर्ट्स क्लब अंतर्गत न्यू बी.डी.डी चाळ, नायगाव- भोईवाडा येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. त्याचबरोबर मनसे आमदार राम कदम यांनी बौद्ध तरुणांना केलेल्या मारहाणीबाबत त्यांच्या विरोधातही निषेध करण्यात आला. यावेळी सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविष्कार क्षीरसागर, अभिजित तांबे, सम्राट इंगळे, निखिल सरवदे, रोहन मोरे, राजेश कानाडे, निखिल पारदे, मनोज मेहता, बाळा माने, ऑस्टिन पाठारे व प्रतिष्ठानचे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
रामदेवबाबा यांनी केलेल्या भाषणाची चित्रफीत पाहिल्यावर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. "राहुल गांधी हे दलितांच्या घरात हनीमून आणि सहलीसाठी जातात. त्यांनी जर दलित मुलीशी लग्न केले तरच ते पंतप्रधान बनू शकतील,' असे रामदेवबाबा म्हणाले होते. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी रामदेवबाबांचे हे विधान दलितविरोधी असल्याची टीका केली आहे. तसेच या बाबतीत भाजप आणि नरेंद्र मोदी यांची काय प्रतिक्रिया आहे, असा सवालही त्यांनी केला होता. कॉंग्रेसनेही रामदेवबाबा यांनी दलित महिलांचा अपमान केला असल्याने त्यांनी जाहीर माफी मागावी यासाठी या विधानावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही कारवाईची मागणी केली होती. तर, बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी त्यांच्या विरोधात निदर्शने केली होती. याचाच एक भाग म्हणून अविष्कार सामाजिक प्रतिष्ठान व लक्ष स्पोर्ट्स क्लब अंतर्गत न्यू बी.डी.डी चाळ, नायगाव- भोईवाडा येथे रविवार (ता.29) रोजी निदर्शने करण्यात आली. शिवाय रामदेव बाबा यांच्यावर अँट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील निदर्शनकर्त्यांनी यावेळी केली. असून मनसे आमदार राम कदम यांनी विक्रोळी येथील बौद्ध तरुणांना अमानुषपणे केलेल्या मारहाणी विरोधातही यावेळी निषेध करण्यात आला. जर राम कदम यांना वेळेत अटक करण्यात आले नाही तर मुंबईभर तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला. त्याचबरोबर आम.राम कदम आणि रामदेवबाबा यांच्या पोष्टरांना काळे फासून जाळण्यात आले.
रामदेवबाबा व आम.राम कदम यांच्या विरोधात नायगाव - भोईवाड्यात निदर्शने करताना अविष्कार सामाजिक प्रतिष्ठान व लक्ष स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी. (छायाचित्र - मुकेश श्रीकृष्ण धावडे)

