धुळे : भाजपाची सत्ता आल्यास समान नागरी कायदा लागू करून आरक्षण हिरावून घेतले जाईल, असा खोटा प्रचार काँग्रेसवाले करत आहेत. दररोज खोटे बोलण्याची त्यांची जुनीच सवय आहे. गेल्या १४ वर्षांपासून गुजरातमध्ये आमची सत्ता असताना कोणाचेही आरक्षण काढण्यात आलेले नाही. किंबहुना ते काढता येणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आणि त्यातले अधिकार बदलण्याची कोणाची हिंमत नाही, असे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी धुळे व नंदुरबार येथे झालेल्या जाहीर सभांमध्ये केले.
लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यातील मतदान येत्या २४ एप्रिल रोजी होत आहे. जाहीर प्रचार संपण्यापूर्वी मोदी यांनी मंगळवारी प्रथम नंदुरबारमध्ये व त्यानंतर धुळ्यात जाहीर सभेला संबोधित केले. धुळ्यातील सभा ही महाराष्ट्रातील १५वी आणि प्रचारातील शेवटची सभा होती. नंदुरबारमध्ये डॉ. हीना गावित यांच्या प्रचारार्थ सभा झाली. मोदी यांनी नेहमीप्रमाणे काँग्रेसचा समाचार घेतला. भाजपाचे सरकार आल्यास समान नागरी कायदा लागू करून आदिवासी, दलित व इतरांचे आरक्षण हिरावून घेतले जाईल, असा खोटा प्रचार ते करत आहेत. वास्तविक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना व अधिकार बदलण्याची हिंमत कुणामध्येही नाही. गुजरातमध्ये १४ वर्षांपासून आमचे सरकार असतानाही आम्ही कुणाचे आरक्षण काढलेले नाही;परंतु जाती-धर्माच्या नावाने समाजात भेद पाडून सत्ता भोगणारेच धर्मनिरपेक्षतेचा आव आणत आहेत. मात्र आता बदलण्याची आणि बदलविण्याची वेळ आली आहे. ही लढाई जाती, धर्म, पक्षाची नाही तर देशाची आहे, असे सांगून मोदी पुढे म्हणाले की, त्यांना ६0 वर्षे दिलीत, मला ६0 महिने द्या. या सेवकाला निवडून द्या. सेवकाला संधी द्या. दिल्लीत मजबूत सरकार देण्यासाठी भाजपाला निवडून द्या, असे आवाहन मोदी यांनी केले.

