मुंबई - बाबा रामदेव यांनी केलेले दलितविरोधी वक्तव्य दुर्दैवी आहे; परंतु रामदेव यांना दलितांवर नव्हे, तर राहुल गांधी यांच्या बेगडी दलितप्रेमावर टीका करायची होती, अशी सारवासारव करत दलितविरोधी वक्तव्याप्रकरणी रामदेव यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत केली.बाबा रामदेव यांच्याविषयी मला आदर होता. वरळीत त्यांच्या हस्ते माझा सत्कारही झाला होता. ‘राहुल गांधी मधुचंद्रसाठी दलितांच्या झोपडीत जातात,’ असे रामदेव यांनी केलेले वक्तव्य समस्त दलितांचा अवमान करणारे आहे. याप्रकरणी रामदेव यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाई करायला व्हायला हवी, अशी मागणी आठवले यांनी केली.
रामदेव यांच्या वक्तव्याचा लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला नक्कीच फटका बसेल, असे स्पष्ट करत भाजप नेत्यांनी रामदेव यांना समज द्यायला हवी. तसेच बाबा रामदेव यांनी वादग्रस्त वक्तव्ये करत मोदी यांच्या पीएम बनण्याच्या वाटेत काटे पेरू नयेत, असा इशारा आठवले यांनी दिला.
रामदास आठवले यांचा रिपाइं पक्ष ‘एनडीए’ आघाडीत सामील आहे. भाजपने त्यांना काही महिन्यांपूर्वी राज्यसभेची खासदारकी बहाल केली आहे. बाबा रामदेव भाजपचे खंद्दे पाठीराखे आहेत. त्यामुळे आठवले यांना रामदेव यांच्याविषयी नाइलाजाने सौम्य भूमिका घ्यावी लागली.रामेदव यांच्या वक्तव्यानंतर आठवले यांनी तीन दिवसांनी आपली भूमिका मांडली. तसेच ‘रामदेव यांना दलितांवर नव्हे, तर राहुल गांधी यांच्या बेगडी दलितपे्रमावर टीका करायची होती,’ अशी सारवासारव करत एक प्रकारे भाजपच्या अडचणीत वाढ होईल, असे वक्तव्य टाळण्याचा आठवले यांनी कसोशीने प्रयत्न केल्याचे दिसले.

