कामिनी शेवाळेंची ट्रॉम्बे पोलिसांकडून चौकशी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कामिनी शेवाळेंची ट्रॉम्बे पोलिसांकडून चौकशी

Share This
मुंबई : मानखुर्द येथील मनसे-शिवसेनेच्या राड्यात जखमी झालेले पोलीस अंमलदार अशोक थोरबोले यांना मंगळवारी अतिदक्षता गृहातून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. त्यांची प्रकृती झपाट्याने सुधारत असून त्यांच्यावर चेंबूर येथील जॉय हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. या हल्ला प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या कामिनी शेवाळे या मंगळवारी प्रथमच हजेरीसाठी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात आल्या होत्या. पोलिसांनी त्यांची या प्रकरणात काही काळ चौकशी केली. कामिनी यांनी सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला असला तरी त्यांना १६ मेपर्यंत रोज पोलीस ठाण्यात हजेरीसाठी जाण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

अंमलदार थोरबोले यांच्या गळ्यावर झालेली जखम ही नेमकी कशामुळे झाली, याची तपासणी बॉम्बे हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांकडून केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या डॉक्टरांच्या तपासणी अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. २४ एप्रिल रोजी पहाटे मानखुर्द येथे झालेल्या मनसे-शिवसैनिकांच्या हाणामारीत एका अज्ञात इसमाने थोरबोले यांच्या गळ्यावर हत्याराने वार केले. त्यात त्यांची अन्ननलिका व श्‍वसननलिकेला गंभीर इजा झाली होती. या हल्ल्याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी शिवसेना कार्यकर्ता व दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी यांच्यासह सतरा शिवसैनिकांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. 

आतापर्यंत या प्रकरणात एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली असून त्यात चार महिला कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. थोरबोले यांच्या गळ्यावरील जखम मोठी असून त्यांना अन्न गिळण्यास त्रास होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना लिक्वीड डायटवर ठेवले असल्याचे सांगण्यात आले. थोरबोले यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणाने पोलीस दलात संतप्त भावना असून या प्रकरणाशी संबंधित असलेल्या आरोपींविरुद्ध अत्यंत कडक कारवाई करण्यात यावी, ही मागणी आता जोर धरू लागली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages