मानखुर्दमध्ये शिवसेना-मनसे राडा - ५ जणांना अटक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मानखुर्दमध्ये शिवसेना-मनसे राडा - ५ जणांना अटक

Share This
शेवाळे यांच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल
कामिनी शेवाळे यांना अटक व सुटका
मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने दक्षिण मुंबई मध्ये शिवसेनेचे उमेदवार असलेल्या राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळेच्या विरोधात ( कलम ३०७, ३३२, १४३, १४९, ११४ नुसार ) खुनाचा प्रयत्न करणे,सरकारी कर्मचार्याला मारहाण, दंगल माजवणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर ५ जणांना अटक केली आहे.

बुधवारी निवडणुकीच्या आदल्या रात्री मुंबईतल्या मानखुर्दमध्ये शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षात पोलीस कॉनस्टेबल गंभीर जखमी झालाय. कार्यकर्त्यांसाठी पाणी आणि इतर साहित्य घेऊन जाणारी मनसेची गाडी शिवसेना कार्यकर्त्यांनी अ़डवली, आणि त्यानंतर त्या गाडीवर दगडफेक केली असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केलाय. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातले शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनीही घटनास्थळी उपस्थित होत्या. पोलिसानी याठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलिस तैनात केले आहे. 

घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांसह उमेदवार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यानाही अटक केली. हे वृत्त  समजताच काही वेळात ट्रॉम्बे पोलिस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने मनसे व शिवसेनेचे कार्यकर्ते जमले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. वातावरण तणावपूर्ण झाल्याचे पाहून पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. राज्य राखीव दलाला बोलावून सुरक्षा वाढवण्यात आली. सहाय्यक पोलिस आयुक्त आणखी जादा कुमक घेऊन ट्रॉम्बे पोलिस ठाणे येथे पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. कामिनी शेवाळे यांना सोडून देण्यात आले असले तरी त्या मुख्य आरोपी असल्यामुळे त्यांना पुन्हा अटक करण्यात येणार असल्याचे ट्रॉम्बे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कदम यांनी सांगितलं . 

पोलीस आयुक्त राकेश मारिया भेट देणार
या घटनेने मुंबई पोलीस दल हादरले आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पोलिसांवर असा हल्ला होण्याची मुंबईतील ही पहिलीच घटना आहे. मुंबई पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिसांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया रुग्णालयात जाऊन जखमी थोरबोले यांची भेट घेणार आहेत.

पत्रकाराला मारहाण
जनादेश वृत्त वाहिनीचे संपादक सुरेश पाटील मनसे आणि सेने मधल्या राड्याचे चित्रीकरण करण्यास गेले असता पाटील यांना पन्हाळे आणि मोहन अडसूळ या दोन पोलिस उपनिरीक्षकांनी ट्रॉम्बे पोलिस ठाण्यामध्ये जबर मारहाण केली. तसेच त्यांनी चित्रीकरण केलेली डिव्ही पोलिसांनी काढून घेतली आहे. पाटील यांना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुरेश पाटील यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने शताब्दी रुग्णालय गाठले. तेथे तपासणी व प्राथमिक उपचार करून  त्यांना सोडून देण्यात आले . त्यांनी या गैरप्रकाराची माहिती मुंबई पोलिसांच्या सर्व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना एस एम एस द्वारे पाठवली आहे . प्रकरणाची चौकशी करून अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी  दिले आहे . 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages