श्रीलंकेहून गौतम बुद्धांच्या अस्थी आणल्याचा दावा करत राम कदम यांनी विक्रोळी, घाटकोपरमध्ये बॅनर लावले. आणि १८ ते २० एप्रिल दरम्यान अस्थी दर्शनासाठी घरी येण्याचं आवाहन दलित बांधवांना केलं. त्यानंतर भारिप बहुजन महासंघाच्या तीन कार्यकर्त्यांनी अस्थींबाबत कदम यांच्याकडे विचारणा केली. यावेळी कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. तसंच जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची आणि मनसेच्या महिला कार्यकर्त्यांवर बलात्कार केल्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी दिल्याचा आरोप कदम यांच्यावर करण्यात आला आहे.
कमद आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत भारिपचे दोन कार्यकर्ते गंभीर जखमी झालेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतंय. या घटनेनंतर दलित संघटनांकडून घाटकोपर, एलबीएस मार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. 'पार्कसाइट पोलिसांनी फक्त एनसी नोंदवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता', असा आरोप होतोय.

