मुंबई- लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील सर्वच राजकीय पक्षाच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे. या निवडणुकीत सुमारे 70 हजार कोटींचा सट्टा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील काही दिवसापासून निवडणुकांवर लागणा-या सट्ट्याचे भाव खुले झाले असून, काही दिवसात हजारों कोटींचा सट्टा लागल्याचे पुढे येत आहे.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना 42 पैसे इतका सर्वाधिक कमी भाव फुटला असल्याची माहिती मिळत आहे. तर अरविंद केजरीवाल यांना 500 रूपये इतका भाव फोडण्यात आली. राहुल गांधींना 7 रूपये, मुलायम सिंह यांना 12, जयललितांना 16 तर ममता बनर्जींना 22 रूपये असा भाव फुटला आहे. यंदाच्या निवडणुकीत ऑनलाईन सट्टा होण्याची शक्यता असून, यातूनच सर्वाधिक उलाढाल होईल अशी माहिती सट्टेबाजारातील सूत्रांकडून मिळत आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे तसेच ती सट्टेबाजांसाठीही राजधानीच आहे. येथे सर्व प्रकारचे सट्टेबाजे चालते. याची उलाढाल हजारो कोटींच्या घरात असतो. त्यामुळे सट्टा खेळणा-यांवरही पोलिसांच्या सायबर सेलची करडी नजर राहणार आहे. या निवडणुकीकडे देशाचेच नव्हे तर सा-या जगाचेच लक्ष केंद्रित झाले आहे. मात्र, या निवडणुकांवर बारकाईने नजर आहे ती सट्टा माफियांची.
नरेंद्र मोदींच्या नावाला सट्टाबाजारात सध्या मागणी आहे त्यामुळेच त्यांच्या नावाला सर्वाधिक कमी पैसे लागले आहेत. याचबरोबर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या लढाईलाही जोरदार सट्टा लागत आहे. यंदा प्रथमच ऑवलाईन सट्टा लागण्याची शक्यता आहे. ऑनलाईन सट्ट्याचे केंद्र परदेशात असणार आहे. त्यामुळे कायदेशीर अडचणी टाळण्याचा प्रयत्न होणार आहे. मात्र, त्यासाठी बुकी आणि पंटर यांनी आपले जाळे टाकण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी सट्टाकिंगवर आयबी आणि सीबीआय करडी नजर ठेवून आहे.

