तीन महिन्यांपासून वेतन नाही सफाई कामगारांचा ठिय्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 May 2014

तीन महिन्यांपासून वेतन नाही सफाई कामगारांचा ठिय्या

मुंबई - कंत्राटदार आणि पालिका अधिकार्‍यांची गर्दी असलेल्या अतिरिक्त पालिका आयुक्तांच्या दालनासमोर सफाई कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. वांद्रे एच-पूर्वच्या कंत्राटी सफाई कामगारांनी गेल्या तीन महिन्यांपासून कंत्राटदाराने वेतनच दिलेले नाही.  दर महिन्याला वेळच्या वेळी व पूर्ण वेतन मिळावे या मागणीसाठी या कामगारांनी अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. 
भांडुप येथे मलनिस्सारण वाहिनीचे काम करताना तीन कामगार मृत्युमुखी पडल्याच्या घटनेनंतर हे कामगार कंत्राटदाराचे सांगून पालिका प्रशासनाने हात वर केले. ही घटना ताजी असतानाच आता वांद्रे येथील कंत्राटी कामगारांनाही कोणी वाली नसल्याचे पुढे आले आहे. सुमारे १०० कामगारांना गेल्या तीन महिन्यांपासून कंत्राटदाराने वेतनच दिलेले नाही. हे सर्व कामगार गेल्या सात वर्षांपासून अनेक कंत्राटदारांकडे रस्ते साफ करण्याचे काम करतात. या सर्व कामगारांनी कचरा वाहतूक श्रमिक संघटनेचे मिलिंद रानडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारले आहे.

कंत्राटी कामगारांची नेहमीच वेतनाबाबत फसवणूक केली जाते. त्यांच्याबाबतच्या नियमावलीचे कधीही पालन केले जात नाही असा आरोप रानडे यांनी केला आहे. कामगारांना रोख रकमेत पगार देताना त्यातही कंत्राटदार पैसे खातात, तर धनादेश दिला तरी तो स्वत: वटवून कामगारांना अर्धेच पैसे दिले जातात. कामगारांचा हजेरीपट ठेवला जात नाही. त्यामुळे पूर्ण दिवस भरले तरी कमीच भरल्याचे दाखवले जाते, कामगारांना दंड केला जातो, असे अनेक आरोप रानडे यांनी केले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS