मुंबई/जेपीएन न्यूज: महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळात पदाधिकाऱ्यांकडून अंदाधुंदी कारभार चालू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनधिकृतपणे पदे अडवून बसलेल्या या पदाधिकाऱ्यांनी आर्थिक घोटाळा केला आहे, असा आरोप मंडळाच्या निकम आणि सांगळे या संघटकांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
मंडळाच्या घटनेला न जुमानता पदाधिकाऱ्यांनी सरचिटणीस आणि मुख्य संघटक अशी पदे निर्माण केली आणि आर्थिक घोटाळा केला, असा आरोप संघटक दीपक निकम, रमेश सांगळे आणि शालन वाघमारे यांनी केला. यासंदर्भात धर्मादाय आयुक्तांकडे 2 मे रोजी तक्रार करण्यात आली असून, त्यावर 5 जूनला सुनावणी असल्याची माहिती त्यांनी दिली. नशाबंदी मंडळ ताब्यात घेतलेल्या पदाधिकाऱ्यांची धर्मादाय आयुक्तांकडे नोंद करण्यात आलेली नाही. मंडळाला राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचा हिशेब जाहीर करण्यात आलेला नाही. मंडळाने मासिक छपाईचा हिशेब दिलेला नाही. धर्मादाय आयुक्त कार्यालयात दर वर्षी "चेंज रिपोर्ट' आणि "ऑडिट रिपोर्ट' सादर केलेला नाही, असे आरोप या संघटकांनी केले.
आरोप खोटे - हुसेन दलवाई, अध्यक्ष
मंडळाच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसचे खासदार हुसेन दलवाई, तर सरचिटणीसपदी वर्षा विद्याविलास आहेत. अमोल मडामे हे मुख्य संघटक असून, एकूण 11 पदाधिकारी आहेत. नशाबंदी मंडळाचे अध्यक्ष खासदार दलवाई यांनी हे आरोप फेटाळून लावले. सर्व आरोप निराधार आहेत. मंडळात कोणताही घोटाळा झालेला नाही. कुणीही मंडळाचे आर्थिक व्यवहार तपासू शकतात. या मंडळाचे काम सामाजिक स्वरूपाचे आहे; मात्र निकम त्याला वैयक्तिक स्वार्थासाठी राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहेत. निकम यांनी स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी असे खोटे आरोप केले आहेत, असे ते म्हणाले.
