मुंबई/जेपीएन न्यूज: मुंबईच्या महापौरांना महानगरपालिकेतर्फे दिलेल्या वाहनावरील 'लाल दिवा' काढून घेण्याचे आदेश राज्य सरकारच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील परिवहन विभागाने दिल्यामुळे महापौर सुनील प्रभू संतापले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या निर्णयाचा फटका महापौर आणि पालिकेच्या आयुक्तांनाही बसला आहे. आयुक्तांच्या वाहनावरही लावण्यात येणारा 'लाल दिवा' सरकारने काढून घेतला आहे. महापौर आणि आयुक्तांच्या वाहनांवर 'अंबर' दिवा लावण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत. मात्र तरीही मला लाल दिवाच हवा असा हट्ट सुनील प्रभू यांनी धरला आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले आहे.
मुंबई हे शहर जागतिक कीर्तीचे असून त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईचे महापौर परदेशी पाहुण्यांचेही स्वागत आणि अतिथ्य करतात. यामुळे महापौरांच्या वाहनांवरील लाल दिवा कायम ठेवावा, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे, अशी माहिती प्रभू यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. १३ डिसेंबर २0१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने 'अ' आणि 'ब' वर्गातील महापौरांच्या वाहनांवरील लाल दिवा काढून त्याजागी 'अंबर' दिवा लावण्याची अधिसूचना जारी केली. त्यानुसार, राज्य सरकारच्या गृह विभागांतर्गत असलेल्या परिवहन विभागाने ४ एप्रिल २0१४ रोजी महापौर आणि आयुक्तांच्या वाहनांवरील लाल दिवा काढून त्याजागी अंबर दिवा लावण्याची अधिसूचना जारी केली.
सरकारने हा निर्णय घेऊन महापौरांचे अवमूल्यन केले आहे. मंत्री, राज्यमंत्री, महापौर आणि त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांच्या वाहनांवर लाल दिवा लावता येतो, असे आदेश यापूर्वीच दिले आहेत. महापौरांनंतर राज्याच्या मुख्य सचिवांची क्रमवारी असताना महापौरांना डावलून मात्र मुख्य सचिवांच्या वाहनांवरील लाल दिवा कायम ठेवून अवमूल्यन केले आहे, असा आरोप त्यांनी केला.'मुंबईचे महापौर परदेशी पाहुण्यांचेही स्वागत व आतिथ्य करतात. शिवाय मुंबई ही देशाची आर्थिक राजधानीही आहे व या शहराची जागतिक कीर्ती असून त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळे मुंबईच्या महापौरांच्या वाहनावरील लाल दिवा कायम ठेवला पाहिजे, अशी मागणी प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सुनील प्रभू यांनी बुधवारी पत्रकारांकडे नाराजी व्यक्त केली तसेच पत्रकारांनी आपली लेखणी वापरून लाल दिवा मिळावा यासाठी सहकार्य करावे असे आवाहन प्रभू यांनी केले आहे.


